करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. आज (गुरुवारी) तहसील कार्यालयात संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये चिवटे हे उशिरा आले होते. मात्र आमदार शिंदे यांनी त्यांना थेट समोर बसण्यासाठी बोलावले. या बैठकीला फक्त अधिकारी होते, त्यात फक्त चिवटे हे शिवसेनेचे पदाधिकारी होते. (राष्ट्र्वादीचे काही पदाधिकारी सोडले तर इतर कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी नव्हते) त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
आमदार शिंदे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठींबा आहे. शिवाय ते सुरुवातीपासूनच पवार यांना नेते मानतात. तर चिवटे हे शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांचे ते बंधू आहेत. माजी आमदार नारायण पाटील व महेश चिवटे यांच्यात सध्या राजकीय संघर्ष असल्याचे चित्र आहे. त्यातच आमदार शिंदे आणि चिवटे यांच्यातील जवळीक हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
आढावा बैठकीमध्ये आमदार शिंदे यांनी चिवटे यांना तुमच्या काही सूचना आहेत का? असे आवर्जून विचारले. त्यानंतर बैठक झाल्यानंतर पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या कक्षात संगणकाचे उदघाटन झाले तेव्हाही आमदार शिंदे यांनी चिवटे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून उदघाटन करण्याचे सूचित केले. हा कार्यक्रम (बैठक आणि उदघाटन) राजकीय नव्हता मात्र चिवटे आणि पाटील यांच्यात दिसत असलेल्या दुराव्यामुळे आता चिवटे आणि शिंदे यांच्यात जवळीक वाढत आहे का? हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
चिवटे हे पत्रकार संघाचे अध्यक्षही आहेत. मात्र ते राजकारणातही सक्रिय असतात. करमाळा शिवसेनेत त्यांचा दबदबा आहे. आदिनाथ कारखान्यात ते शासन नियुक्त संचालक मंडळात सदस्य आहेत. मंत्री तानाजी सावंत यांचेही ते समर्थक आहेत. त्यातच आज झालेल्या आढावा बैठक आणि पोलिस ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे आणि चिवटे यांची दिसलेली जवळीक हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.