करमाळा (सोलापूर) : ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चिखलठाण गटातून पृथ्वीराज पाटील व वांगी गटातून दत्तात्रय रणसिंग यांना आमदार नारायण पाटील यांनी पाटील गटातून उमेदवारी द्यावी’ अशी मागणी विशाल तकिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
तकिक यांनी म्हटले आहे की, ‘पाटील गट हा सर्वसामान्यांचा गट आहे. आमदार पाटील यांच्यामुळेच ही ओळख निर्माण झाली आहे. वांगी गट आणि चिखलठाण गट हे आमच्यासाठी महत्वाचे आहेत. चिखलठाणमध्ये सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळे तालुक्यातून सर्वांच्या नजरा या गटाकडे आहेत. या गटामधून पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी. कोणासोबत युती असो अन्यथा नसो. त्यांना तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उतरवण्याची हीच सुवर्णसंधी आहे.’
वांगी गट हा पाटील यांचा पहिल्यापासून बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या गटातून आमदार पाटील हे जिल्हा परिषदेला दोन वेळेस निवडून आलेले आहेत. या विधानसभेला देखील त्यांना येथून लीड मिळाला आहे. वांगी भागामध्ये वांगी गटाचा विचार केला तर वांगी नंबर तीन, वांगी नंबर दोन, वांगी नंबर एक, जेऊर आणि शेलगाव ही प्रमुख आणि मोठी गावे आहेत. परंतु या जिल्हा परिषद गटासाठी वांगी नंबर दोनचे दत्तात्रय रणसिंग हे इच्छुक आहेत. त्यांना वांगी भागातून पाटील गटातील कार्यकर्त्यांकडून पसंती आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी व पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीची मेळाव्यामध्ये मागणी आपण केली होती, असे त्यांनी म्हटले आहे.
