करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटील गट स्वतंत्रपणे लढणार आहे’, अशी माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गट उमेदवारांची चाचपणी करत आहेत. अशातच पाटील गटाकडून निवडणुकीबाबत भुमिका मांडण्यात आली आहे.
तळेकर म्हणाले, ‘आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक पुर्ण ताकदीने लढवली जाणार आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील सहकारी गटांना बरोबर घेऊन या निवडणुकीची आखणी केली जाणार आहे. परंतू सध्या विरोधकांनी पाटील गटाची भुमिका चुकीच्या पध्दतीने मांडुन दिशाभुल करण्याचे काम सुरु केले आहे. विरोधकांनी पाटील गटाच्या भुमिकेविषयी व युती- आघाडी विषयी बोलण्याऐवजी स्वतःच्या गटाची व गट नेतृत्वाची भुमिका आपल्या कार्यकर्त्यांना ठासुन सांगावी’, असे ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना तळेकर यांनी म्हटले आहे की, ‘तालूक्याच्या विकासात पाटील यांचे महत्वाचे योगदान आहे. याविषयी मतदार सर्वकाही जाणुन आहेत. यामुळेच २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत १७ हजार मतांच्या फरकाने पाटील विजयी झाले आहेत. आमदार पाटील यांच्याकडून संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरु असुन नवीन चेहऱ्यांना या निवडणुकीत संधी दिली जाणार आहे. यानिमित्ताने पाटील गटाकडून मंगळवारी जेऊर येथे मेळावा होणार आहे.’
