करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री ते तरटगाव बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी अर्बन बँकेचे माजी संचालक चंदक्रांत चुंबळकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा रस्ता महत्वाचा असून अनेक विद्यार्थी चिखल तुडवत या रस्त्याने ये- जा करतात.
बिटरगाव श्री येथून भोसले व दळवी यांच्या बांधावरून कॅनलवरून हा रस्ता सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याकडे जातो. या रस्त्याने बोराडे, मुरूमकर, नलवडे, पाटील, शिर्के आदींची वस्ती आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. येथून अनेकजण रस्त्याने ये- जा करतात. या रस्त्यावर सध्या पावसाने चिखल झाला आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा ऊस काढण्यासाठीही येथे मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे या रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे चुंबळकर यांनी म्हटले आहे.