करमाळा (सोलापूर) : अनैतिकसंबधातील हत्याप्रकरणातील संशयित आरोपींना आज (बुधवारी) करमाळा न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती समजत आहे. करमाळा (सोलापूर) शहर हद्दीत नगर हायवेच्याजवळ ‘आयटीआय’समोर कुकडी कॅनलच्या बाजूला निर्जनस्थळी एका कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. हा खून असल्याचे करमाळा पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याचा तपास लावून नाशिक जिल्ह्यातून दोन संशयित ताब्यात घेतले आहेत. याचा कसून तपास सुरु असून याचा उलघडा लवकरच होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास सुरु आहे. संशयित ताब्यात घेण्यासाठी तातडीने करमाळा पोलिसांचे पथक नाशिक येथे गेले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर, पोलिस हवालदार अजित उबाळे, गणेश शिंदे, तोफीक काझी यांचा या पथकात समावेश होता. खून झालेली व्यक्ती नाशिक जिल्ह्यातील अडसुरेगाव (ता. येवला) येथील आहे. श्रावण रघुनाथ चव्हाण (वय ३९) असे त्याचे नाव आहे. यामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना करमाळा न्यायालयात हजर केले जाणार आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मिटू जगदाळे हे करत आहेत.
अनैतिक संबंधातून हा खून झाला असल्याचा संशय असून यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुनील घाडगे (रा. अंदरसूळ) त्याचा भाऊ व पत्नी या तीन संशयितांविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.