करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्यात बंदी असलेली सुगंधी तंबाखू व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये वाहनासह ११ लाख २१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २८ जुलैला गुन्हे प्रकटीकरण शाखेने पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी दिली आहे.
सोमवारी (ता. २८) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एक चारचाकी संशयित माल वाहतूक गाडी करमाळ्यातून जातेगावकडे जात होती. दरम्यान पोलिसांनी खाजगी वाहनाने त्याचा पाठलाग केला. संबंधित वाहन चालकाला माहिती विचारल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याच्या गाडीत पाहिले तेव्हा हिरव्या व तपकिरी रंगाच्या गोण्या दिसल्या. त्या गोण्यात खोलून पाहिले तेव्हा सुगंधी तंबाखू व गुटख्याची पाकिटे दिसली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन करमाळा पोलिस ठाण्यात त्याला आणले. त्यात २ लाख १४ हजार ५०० रुपयांची पानमसाल्याची १ हजार ६५० पाकिटे, १ लाख ७ हजार २५० रुपयांची ७१४ तंबाखूची पाकिटे सापडली. यासह ८ लाखाचे माळ वाहतूक वाहन असा साधणार ११ लाख २१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयित राजेंद्र विनायक बाविस्कर (वय ४०, रा. देवराई, जि. संभाजीनगर) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलिस नाईक मनीष पवार, पोलिस कॉन्स्टेबल गणेश खोटे, अर्जुन गोसावी, स्वप्नील शेरखाने, रविराज गटकुळ, अमोल रंदील, योगेश येवले, मिलिंद दहिहंडे, सायबरचे व्यंकटेश मोरे आदींनी कामगिरी केली.