सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा…’ या चित्रपटाचं टायटल साँग लाँच करण्यात आलं आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारं हे गाणं असून, दोन दमदार गाण्यांनी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे. २१ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी “लास्ट स्टॉप खांदा… ” प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत.
प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट लास्ट स्टॉप खांदा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटातलं ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं या पूर्वीच लोकप्रिय झालं आहे. त्याशिवाय चित्रपटाच्या टीजरला सोशल मीडियातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता चित्रपटाचं टायटल साँग लाँच करण्यात आलं आहे. या गाण्याला अतिशय साधेसोपे शब्द, उडती चाल, प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या ठेक्याची जोड मिळाली आहे. श्रेयस राज आंगणे याने लिहिलेल्या या टायटल सॉंगला सुहास सावंत यांचा स्वरसाज लाभला असून संगीत श्रेयस राज आंगणे यांचे आहे, तर नृत्यदिग्दर्शन राहुल बनसोडे, रवी आखाडे यांचे आहे.
श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश करपेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांचं असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत.
मनोरंजक कथानक, उत्तम अभिनेते असलेल्या या चित्रपटाविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
