करमाळा (सोलापूर) : यावर्षी कमी पावसामुळे उजनी धरण पूर्ण भरलेले नाही. असे असताना पाणी सोडण्याचे नियोजन ढिसाळपणे झाले असल्याचा आरोप करत उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. बेहिशोबी पाणी सोडल्यामुळे लवकरच धरण मायन्समध्ये जाईल, आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून काटेकोरपणे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. (The Ujani Dam affected Sangharsh Committee will give a statement to Karmala Tehsildar on Friday)
उजनी धरण यावर्षी फक्त 66 टक्केच भरले होते. त्यात कालवा सल्लागार समिती, उजनी धरण व्यवस्थापनच्या ढिसाळ नियोजनामुळे दीड महिन्यात सोडलेल्या बेहिशोबी पाण्यामुळे उजनी डिसेंबरमधेच 25 टक्क्यावर आले आहे. उजनीचा कालवा, भिमा सिना जोडकालवा, सिना माढा व दहिगाव उपसासिंचन योजनेतून रोज 5 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी कमी होत आहे. त्यातच पुन्हा नदीद्वारे पाणी सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच उजनी मायनसमध्ये जाण्याचा धोका आहे.
डिसेंबर संपण्यापूर्वीच अशी अवस्था असेल तर फेब्रुवारी ते जून अखेर सहा महिने आपलं कसं होणार? हा प्रश्न असून उजनी काठचा शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याव्रर उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती आक्रमक झाली असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ कालवा सल्लागार समिती व उजनी धरण व्यवस्थापन यांनी काटेकोर पाणी नियोजन करावे अशी मागणी केली आहे. उजनी धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागता कामा नये. त्यांच्यावर वीज कपातीचं संकट येता कामा नये यासाठी या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 8) सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले जाणार आहे.