करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) सोमवारी (ता. २१) सोलापुरात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थित आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळ्यातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांनी दिली आहे. माजी आमदार शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कायम नेते मानतात. या आढावा बैठकीसाठी काही दिवसांपूर्वी करमाळ्यात त्यांच्या संपर्क कार्यालयात नुकतीच जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.
माजी आमदार शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले होते. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण पाटील हे विजयी झाले. माजी आमदार शिंदे हे पक्ष चिन्हावर निवडणुकीत उतरले असते तर ते विजयी झाले असते, अशी सर्वत्र चर्चा आहे. करमाळ्याच्या बैठकीत यावर उमेश पाटील हे स्पष्टच बोलले होते. शिंदे यांनी त्यांच्या काळात मतदारसंघात साडेतीन हजार कोटींचा विकास निधी आणला होता. मात्र राजकीय डावपेचात त्यांचा पराभव झाला होता. पराभव झाला तरी त्यांच्या मतांची संख्या २०१९ च्या तुलनेत वाढलेली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर करमाळ्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांची मताची आकडेवाडी वाढलेली आहे. जिल्हा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात होणारा राष्ट्रवादीचा मेळावा महत्वाचा असून त्यात करमाळ्याचे शक्तिप्रदर्शन करण्याचा मानस असल्याचे अवताडे यांनी सांगितले आहे.
अवताडे म्हणाले, करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातून सोलापूरला कार्यकर्ते येणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांना मानणारा करमाळ्यात मोठा वर्ग आहे. माजी आमदार शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील प्रत्येक गावात विकास कामे केली आहेत. या विकास कामांमुळे माजी आमदार शिंदे यांचे समर्थक वाढत आहेत. त्यांना तालुक्यातील नेते विरोध करत असले तरी सर्वसामान्य नागरिक त्यांच्याबरोबर आहे. हे वाढलेल्या मतांच्या आकडेवारीवरून दिसत आहे.