करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘मामाच्या मुलीसोबत फोनवर बोलत जाऊ नको’, असे म्हणत शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी देऊन तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये राम बेलगंग्या पवार (वय १९, रा. पोफळज, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लखन जिगर काळे (रा. दहिगाव) व बतुल्या जिगर काळे (रा. कोंढेज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
१४ ऑगस्टला करमाळा पोलिसात दाखल गुन्ह्यातील फिर्यादीनुसार गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे मामाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यांचे फोनवर बोलणे व्हायचे. मात्र तिला गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी त्रास देत होते. याची तिने तक्रारही दिली होती. तेव्हापासून संशयित आरोपी आत्महत्या केलेल्या तरुणाला शिवीगाळ करून धमकी देत होते.
‘तू जर तिच्याशी लग्न केले, फोनवर बोलला तर तुला जिवंत सोडणार नाही’, अशी ते धमकी देत होते. त्यामुळे तो तणावाखाली होता. माझ्या जीवाला धोका असल्याचेही तो सांगत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत त्यांना समजावूनही सांगितले होते. मात्र ते ऐकत नव्हते. १३ तारखेला तरुणाने घरात दरवाजा बंद करून अँगलला गळफास लावून आत्महत्या केली आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.