करमाळा (सोलापूर) : १५ वा वित्त आयोगांतर्गत २०२४- २५ व २०२५- २६ चा प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर झाला असून यामध्ये करमाळा तालुक्यातील करंजे, निंभोरे, फिसरे व मांगी आरोग्य उपकेंद्रासाठी दोन कोटी ९४ लाख ४६ हजार निधी मंजूर झाला आहे. आरोग्य सेवा व अभियान संचालक आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून याबाबत आदेश निघाला आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला आहे.
२०२१ पासून माजी आमदार शिंदे हे या कामासाठी पाठपुरावा करत होते. या कामामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत होणार आहे. हे काम त्वरित करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याची सूचना करण्यात आली आहे. कामांची प्रशासकिय मान्यता, अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया नवीन मंजूर कार्यप्रणालीप्रमाणे करण्याची सूचना राज्य आरोग्य सोसायटीचे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार यांनी दिली आहे.
या आराखड्यानुसार ग्रामीण रुग्णालय करमाळा येथे BPHU बांधकाम करण्यासाठी ५० लाख, करंजे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रसाठी ६१.१९ लाख, निभोरेसाठी ६१.१९ लाख, फिसरेसाठी ६१.१९ लाख व मांगीसाठी ६१.१९ लाख मंजूर झाले आहेत.