करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील २०२४ मध्ये मुदत संपलेल्या तीन गावांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. मतदार याद्या, आरक्षण सोडत, हरकती अशी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे या निवडणुका लांबल्या होत्या. आता या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर होणार की आधी होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मतदार यादी ही पुन्हा होणार की आहे त्याच यादीवर निवडणूक होणार हे पहावे लागणार आहे.
करमाळा तालुक्यातील भाळवणी, वरकुटे व लव्हे या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील २०२४ मध्ये मुदत संपलेल्या साधणार ५० ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने झाली होती. निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार यादी झाली होती. मात्र निवडणूक झाली नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर या निवडणुका होणार आहेत. २०२५ मध्ये साधणार डिसेंबरच्या दरम्यान पोथरे, आळजापूर, बिटरगाव (श्री), बाळेवाडी या ग्रामपंचायतीचीही मुदत संपत आहे. त्यात लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचाही निवडणुका या वर्षात होणार आहेत.
राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिकांवर प्रशासक आहेत. निवडणुकांची मुदत संपूनही न्यायालयात याचिका असल्याने या निवडणूक झाल्या नाहीत. मात्र या वर्षात या निवडणूक होतील असा अंदाज आहे. सध्या तालुक्यात वरकुटे, भाळवणी व लव्हे या ग्रामपंचायतीसाठी स्थानिकांमध्ये उत्सुकता आहे. या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.