करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध महायुतीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात खरी लढत होत आहे. येथे मोहिते पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी घेतलेल्या सभेने चांगलेच वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. तर खासदार निंबाळकर यांच्यावर मात्र नाराजी वाढू लागली आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर एकतर्फी वाटणारी ही निवडणूक भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.
‘मोदी की गॅरंटी ४०० प्लस’चा नारा देत भाजप या निवडणुकीत उतरले आहे. पहिल्याच यादीत भाजपने माढ्याची उमेदवारी खासदार निंबाळकर यांना दिली. मात्र याच उमेदवारीमुळे मोहिते पाटील समर्थक नाराज झाले आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली. मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी त्यांचे समर्थक, राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेनाचे (ठाकरे गट) पदाधिकारी गावागावात कामाला लागले आहेत. ‘मोदींविरुद्ध ही लाट असून आपण केलेली विकास कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी निंबाळकरांनी अजून यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे.
आमदार रोहित पवार यांनी करमाळ्यात येऊन मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी नागरिकांनी ही निवडणूक हातात घेण्याचे आवाहन केले होते त्यानुसार त्यांचे चाहते कामाला लागले आहेत. निंबाळकरांच्या प्रचार यंत्रणेत मात्र अनेक त्रुटी असल्याचे दिसत आहे. आमदार संजयमामा शिंदे हे स्वतः निंबाळकरांसाठी गावभेट दौरा करत आहेत. निंबाळकरांबरोबर भाजपसह रयत क्रांती, आरपीआय (ए), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासह बागल गट व जगताप गट आहे. आमदार शिंदे यांनी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार कार्यकर्ते काम करतील का हा प्रश्न आहे?
खासदार निंबाळकर यांच्यावर छोट्याछोट्या गोष्टींमुळे नाराजी आहे. त्यांनी गावांमध्ये संपर्क ठेवला नाही. काही ठराविकच पदाधिकाऱ्यांना ते भेट असल्याचा आरोप खासगीत कार्यकर्ते करत आहेत. बागल, शिंदे, जगताप व शिंदे गट एकत्र असला तरी अजूनही गावागावात त्यांचे मनोमिलन झालेले नाही. गावागावातून मताधिक्य मिळाले तर त्याचे श्रेय कोणाला जाणार? यावर मतभेद असल्याचे दिसत आहे. निंबाळकर यांनी पाच वर्षात सर्वसामान्य नागरिकांचे फोन उचलले नाहीत, असाही आरोप केला जात आहे. याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगताप गटाची काय नाराजी आहे का? हेही पाहणे आवश्यक आहे. बागल गटाचे अनेक पदाधिकारी कामाला लागले आहेत, मात्र उघडपणे त्यांनी प्रचार करण्याची गरज आहे. निंबाळकरांनी त्यांच्या प्रचारातील उणीवा वेळीच पहिल्या नाही तर त्याचा फटका त्यांना बसू शकतो.
करमाळ्यात निंबाळकरांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या! व्हिडिओ व्हायरल