करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या निकालात चिखलठाण, कंदर, वीट, रावगावमध्ये धक्कादायक निकाल लागले असून येथे सत्ता परिवर्तन झाले आहे. तर कावळवाडी, जेऊर व केममध्ये सत्ता राखण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. या निवडणुकीत शिंदे, पाटील, बागल व जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर सोईनुसार निर्णय घेतले होते. रावगावमध्ये राष्ट्रवादीचे संतोष वारे यांनी स्वतः लक्ष घातले होते. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व्हावी म्हणून पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त होता. ही प्रक्रिया तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
विजयी झालेल्या जागांमध्ये गटांच्या कार्यकर्त्यांकडून सध्या वेगवेगळे दावे केले जात आहेत. निकाल समजताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. चिखलठाणमध्ये चंद्रकांत सरडे यांच्या पत्नीचा पराभव झाला असून येथे विकास गलांडे यांच्या पत्नी विजयी झाल्या आहेत. निकाल समजताच कार्यकर्त्यांनी गलांडे यांना उचलून घेऊन जल्लोष केला. त्यांना शिंदे गटाचे समर्थक राजेंद्र बारकुंड यांनीही पाठींबा दिला होता. येथे बागल व पाटील गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते.
रावगावमध्ये शिंदे व जगताप गटाचे दादासाहेब जाधव यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. येथे पाटील व बागल गटाच्या शेळके विजयी झाल्या आहेत. कोर्टीत बागल गटाची सत्ता आली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनीही काही गावांवर दावा केला आहे.
निकाल जाहीर झाले तेव्हा कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सरपंचपदाचे दावे
१) वीट : महेश गणगे (शिंदे गट)
२) कोर्टी : भाग्यश्री नाळे (बागल गट)
३) रावगाव : रोहिणी शेळके (पाटील व बागल गट)
४) चिखलठाण : धनश्री गलांडे (बागल व पाटील गट)
५) घोटी : विलास राऊत (शिंदे गट)
६) निंभोरे : रवींद्र वळेकर (शिंदे गट)
७) कंदर : मौला मुलाणी (अण्णासाहेब पवार यांच्या दाव्यानुसार जगताप गट मात्र येथे इतरही गट असल्याचे सांगितले जाते)
८) गौडरे : सुभाष हनपुडे (शिंदे गट)
९) कावळवाडी : राणी हाके (बागल व पाटील गट)
१०) रामवाडी : शिंदे गट गौरव झंजुर्णे
११) केतुर : सचिन वेळेवर (सर्वपक्षीय )
१२) भगतवाडी : माउली भागडे (पाटील गट)
१३) केम : सारिका कोरे (अजित तळेकर मोहिते पाटील समर्थक पाटील गट)
१४) जेऊर : पृथ्वीराज पाटील (पाटील गट)
१५) राजुरी : सोनाली भोसले (पाटील गट)
१६) उंदरगाव : बिनविरोध