सोलापूर : देवस्थानाचा व परिसराच्या विकासासाठी विश्वस्तांनी तडजोड करून वाद मिटवून देवस्थानास प्रगती पथावर घेवून जावे, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त सुनीता कंकणवाडी यांनी केले.
श्री महासिद्ध देवस्थान डोणज (ता. मंगळवेढा) हे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु देवस्थांनाच्या तीन वर्षापासून विश्वस्तांमधील अंतर्गत वाद धर्मादाय उप आयुक्त सोलापूर यांच्या कोर्टात प्रलंबित असल्याने गावातील भक्तगण, भाविक असंतुष्ट होते. धर्मादाय उप आयुक्त यांनी दोन्ही पक्षातील विश्वस्तांना एकत्रित आणून त्यांच्यातील अंतर्गत वाद योग्य ते मार्गदर्शन तसेच सल्ला देवून तडजोड घडवून आणण्यात यश आले. यावेळी विश्वस्तांनी देखील या तडजोडीस सहकार्य केले.
विश्वस्तांच्या तडजोडीमुळे श्री महासिद्ध देवस्थानाच्या जिर्णोधाराच्या कामास गती मिळणार आहे व देवस्थानांची यात्रा, सण, उत्सव हे आनंद व उत्साहात पार पडतील, असे मत विश्वस्तांनी मांडले यावेळी मांडले. देवस्थानच्या विकासासाठी ज्याप्रमाणे विश्वस्तांनी एकत्र येवून अंतर्गत वाद मिटवून तडजोड केली, याच पध्दतीने वाद असलेल्या इतर संस्थांनी देखील तडजोड करावी आणि देवस्थानास प्रगती पथावर घेवून जावे असे आवाहनही धर्मादाय उप आयुक्त कंकणवाडी यांनी केले. यावेळी कार्यक्रमास अधीक्षक स. सु. कुमठेकर, वी. स. कांबळे, कार्यालयीन कर्मचारी तसेच श्री महासिद्ध देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. यावेळी धर्मादाय उप आयुक्त कार्यालयाच्यावतीने धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी व विश्वस्तांचे अभिनंदन केले.