Videoकौतुक करत पाटलांकडून मामांना बळ देण्याचा प्रयत्न! राष्ट्रवादीच्या बैठकीत काय होते मुद्दे? काय होणार शिंदे गटावर परिणाम

करमाळा (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज (बुधवारी) करमाळ्यात माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात आढावा बैठक झाली. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी या बैठकीत माजी आमदार शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ‘पक्षाचे तिकीट घेतले असते तर मला त्यांचा उल्लेख माजी आमदार म्हणून करावा लागला नसता’ असे ते म्हणाले. या मेळाव्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना निरोप नव्हते. फक्त पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता, असे सांगितले जात आहे. मात्र या मेळाव्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक परिणाम होईल, असे चित्र आहे. पाटील यांनी पक्ष वाढीसह शिंदे यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचा कसा परिणाम होईल हे पहावे लागणार आहे.

‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते’, असे म्हणत पाटील यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. ‘संजयमामा शिंदे यांनी घड्याळ घेतले असते तर माजी आमदार म्हणण्याची माझ्यावर वेळच आली नसती. गेल्यावेळी निवडणुकीत मामांना फायदा कसा होईल यांचे गणित बसवले होते. मात्र यावेळी मात्र गरबड झाली’ असे ते म्हणाले.

पुढे बोलताना उमेश पाटील म्हणाले, ‘संजयमामा आणि मी जिल्हा परिषदेत एकत्र काम करत होतो. त्यांची कार्यपद्धती मला माहित आहे. काहीजण फुटकळ आहेत. त्यांनी मामांजवळ माझे काहीतरी चुकीचे सांगितले होते. विरोधात असताना त्यांनी माझ्या गावात निधी दिला त्याचा मला अभिमान आहे. मी हजार ठिकाणी म्हटले आहे की मामांसारखा सोलापूर जिल्हा परिषदेला पुन्हा जिल्हाध्यक्ष होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे.’ ‘अकलूजमध्ये विजयीदादांनी विकास केला पण काही लोकांना ते टिकवता येत नाही’, असे म्हणत त्यांनी मोहिते पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला.

‘पक्ष संघटनेला कमी लेखल्यामुळे राजकारणात परिणाम होत आहे. गट तर महत्वाचे आहेतच पण गट प्रमुख असलेल्या नेत्याला देखील कोणाचा तरी आशीर्वाद लागतो’, असे म्हणत त्यांनी पक्षाचे महत्व कार्यकर्त्यांना सांगितले. मामांनी पक्षात उघडपणे यावे, असेही यातून त्यांनी आवाहनच केले असल्याचे दिसत आहे. ‘पक्षावर प्रेम करणारा मतदार असतो आणि तो मतदार निवडणुकीत त्याची महत्वाची भूमिका असते’, असेही पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ‘सोलापुरात राष्ट्रवादीचे (दादा गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत २१ तारखेला मेळावा होत आहे. तेथे माजी आमदार शिंदे यांचा सत्कार झाल्यानंतर जोरदार आवाज झाला पाहिजे. तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांचाही यावेळी सत्कार होणार आहे. त्याच्याही सत्कारानंतर आवाज झाला पाहिजे,’ असे ते म्हणाले. ‘करमाळा हे माझ्या पाहुणे रावळ्यांचे गाव आहे. मी त्यात कधी राजकारण करत नाही. मात्र सांगितले तर ५- ६ हजार मते फिरवू शकतो,’ असेही त्यांनी विधान केले आहे. तालुकाध्यक्ष भारत अवताडे, ऍड. नितिनराजे भोसले, ऍड. शिवराज जगताप, सरपंच रवींद्र वळेकर आदी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *