-

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात अंडरग्राऊंड वीज पुरवठा करण्यासाठी यंत्रणा उभारली पण हे काम फक्त कागदावरच राहिले आहे. करमाळा शहरातील मेन रोडवर याची उभारलेली खोकी आहेत मात्र सध्या तीच अडचणीची ठरत आहेत. दरवर्षी गणेशोत्सवावेळी ही खोकी काढण्याची मागणी होते. यावर्षी तरी संबंधित विभागाने ही खोकी काढावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

वीज गळती रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी वेगवेगळे प्रयत्न करते. त्यात अंडरग्राऊंड वीज पुरवठा हा एक आहे. यामुळे अनेक धोकेही टळतात. यामुळे पुरवठाही चांगला होतो. सध्या मुंबईत भूमिगत वीज वितरण नेटवर्क आहे, तर पुणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद ही शहरे अंशतः समान प्रणालीने व्यापलेली आहेत. भूमिगत प्रणाली विश्वसनीय वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात मदत करते आणि ओव्हरग्राउंड वायरच्या नेटवर्कच्या तुलनेत व्यत्यय आणि चोरीची शक्यता कमी करते. मात्र करमाळ्यात ही यंत्रणा कागदावरच राहिली असून त्यामुळे वाहतुकीस अडचण होत आहे. करमाळा शहरात अंडरग्राऊंड वीज पुरवठ्यासाठी असलेली निकामी खोकी काढून टाकण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.

श्रेणिकशेठ खाटेर, सामाजिक कार्यकर्ते
करमाळा शहरात भूमिगत वीजपुरवठा करण्यासाठी उभा केलेली खोकी काढून टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे फायदा होण्यापेक्षा अडथळा ठरत आहेत. वाहतूक कोंडीस ही खोकी देखील कारणीभूत ठरत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाने ही वीज पुरवठ्याची खोकी काढून टाकावीत.

संजय घोलप, मनसे तालुकाध्यक्ष
करमाळा शहरात फुलसुंदर चौक ते जय महाराष्ट्र चौक या दरम्यान दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत वीज तारेची अडचण होते. येथील तारा या जुन्या पद्धतीच्या आहेत. त्यामुळे त्याला मिरवणुकीवेळी देखावे केलेले अनेकदा वीज वाहक तारांना लागते. त्यामुळे येथे सिंगल केबल टाकण्याची गरज आहे. भूमिगत वीज पुरवठ्यासाठी उभारलेली बंद अवस्थेतील खोकी देखील अडथळा ठरतात. त्यामुळे ती खोकी त्वरित काढण्याची गरज आहे. गणेश उत्सवात अडथळा येऊ नये म्हणून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

प्रशांत ढाळे, माजी नगराध्यक्ष, करमाळा
गणेश विसर्जन मिवर्णुकीच्या मुख्य मार्गावर भूमिगत वीज पुरवठ्याची खोकी अडथळा ठरत आहेत. ही खोकी बंद अवस्थेत आहेत. सुरु असती तर काही नाही मात्र कामही पूर्ण झालेले नाही खूप दिवसांपासून ही खोकी अडथळा ठरत आहेत. करमाळा शहरात वेताळ पेठसह अनेक ठिकाणी तारा काडून केबल टाकली आहे. मात्र मेन रोडवर जुन्या तारा आहेत. त्याचा अडथळा होतो याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सुनील सावंत, सावंत गटाचे नेते
आम्ही दरवर्षी भूमीगत वीज पुरवठ्याची खोकी काढण्याबाबत तक्रार करत आहोत, मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. या खोक्याची सर्वांना अडचण होत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनाही याची अडचण असून ही खोकी काढण्याची गरज आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याची आवश्यकता आहे. याबाबत नगरपालिका फक्त मुरूम टाकून देऊ असे सांगत आहे. एवढ्या मोठ्या उत्सहात मुरुमाने खड्डे कसे बुजणार हा प्रश्न आहे. कारण मोठा पाऊस आला तर मुरूम वाहून जाऊ शकतो. त्यामुळे हा खड्डे कायमचे बुजवणे आवश्यक आहे.

जितेश कटारिया, करमाळा
करमाळा शहरात गणेशोत्सवात येणारे अडथळे याबाबत आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेतली होती. शहरात मोकाट जनावरे वाढली आहेत. त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे आहेत. ते बुजणे आवश्यक आहे. त्याशिवाय गणेश विसर्जनासाठी हौद उभारण्याची मागणी आम्ही केली होती. कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *