करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या विकासासाठी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी केले आहे.
वांगी नं. ३ येथे श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालकांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा झाला. मकाईचे माजी अध्यक्ष बागल म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत करमाळा तालुक्यातील सर्व बांधवांना बरोबर घेऊन लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय दिला आहे. तोच वारसा आम्ही चालवत आहोत.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मकाई सहकारी साखर कारखाना अडचणींतून बाहेर काढण्यासाठी आम्ही स्वतः ची शेती व घर गहाण ठेवले. मात्र स्व. मामांनी उभी केलेली संस्था कधीही बंद पडू देणार नाही. दहा वर्षांपासून तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी सर्वांच्या हक्काचा, उच्चशिक्षित, विविध प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारांशी आपण पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.
वांगी परिसरातील रस्ते, वीज, पुनर्वसन नागरी सुविधा व उजनी धरणातील पाणी व्यवस्थापन विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वास त्यांनी दिला आहे. यावेळी संचालकपदी निवड झालेले गणेश तळेकर, युवराज रोकडे यांचा सत्कार करण्यात आला. मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे, बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, साहेबराव रोकडे, पांडुरंग जाधव, राऊकाका देशमुख, संपत देशमुख, पांडुरंग शेटे, अर्जुन तकीक, सतीश नीळ, कल्याण सरडे, लक्ष्मण महाडिक, कुलदीप पाटील, देवा ढेरे, लक्ष्मण केकान, संतोष पाटील, डॉ. विजय रोकडे, गणेश झोळ, अजित झांझुर्णे, महेश तळेकर, विलास काटे, जयदीप देवकर उपस्थित होते.
बागल गटापासून दुरावलेल्यांना पून्हा सोबत घेणार
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माध्यमातून बागल गटापासून दुरावलेल्या सर्वांना पून्हा सोबत घेऊन करमाळा तालुक्यातील रीटेवाडी उपसा सिंचन योजना, मांगी तलाव, करमाळा एमआयडीसी, वडशिवने तलाव, उजनी जलाशयावरील पूल तसेच पाण्याचे नियोजन, सीना कोळगाव धरण, रस्ते विकास असे विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून दोन महिन्यात संपूर्ण तालुका पिंजून काढणार असल्याचे बागल यांनी सांगितले.