करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात आरपीआयचे नेते नागेश कांबळे हे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना पाठींबा देण्याच्या तयारीत आहेत. ‘करमाळा मतदारसंघात आपण एक प्रयोग करण्याच्या विचारात असून महाविकास आघाडी व महायुती या दोन्हींना अद्दल घडवण्यासाठी त्यांना मतदान न करता ताकद दाखविणार असल्याचे बॅनर्स सोशल मीडियातून नागेशदादा कांबळे मित्र परिवाराच्या नावे फिरत आहेत.’ त्यावरून ते काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या निर्णयाचा महायुती व महाविकास आघाडीला फटका बसणार असल्याचे बोलले जात असून आमदार शिंदे यांचे पारडे जड होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कांबळे हे आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजता त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत. कांबळे हे बहुजनवादी चळवळीतील मोठे नाव आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. नुकत्याच त्यांनी काढलेल्या संविधान बचाव मोर्चाला त्यांच्या हाकेला ओ देत करमाळ्यात हजारोंची गर्दी स्वयंस्फूर्तीने जमा झाली होती. कांबळे यांच्या भूमिकेमुळे आधीच चुरशीची होत असलेली ही निवडणूक अधिक चुरशीची होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.