करमाळा (सोलापूर) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कॅनालमध्ये वर्षभर पाणी राहिल, असे नियोजन करणार असल्याचे आश्वासन माजी आमदार नारायण पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. सरफडोह येथे गावभेट दौऱ्यात ते बोलत होते.
माजी आमदार पाटील म्हणाले, दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या हक्काचे १.८० टीएमसी पाणी चार वर्षात एकाही वर्षी उचलले गेले नाही. तर दहिगाव येथील सहा पंप आणि कुंभेज येथील चार पंप असे सर्व पंप एकाचवेळी चालवताना पहायला मिळाले नाही. यामुळे पुर्वभागाचे हक्काचे पाणी उजनीत शिल्लक राहिले. यामुळे मग इतर आमदारांनी अगदी अक्कलकोटपर्यंत उजनीचे पाणी पळवून नेले. २०२४ मध्ये नागरिकांनी संधी द्यावी, एकदाही तुम्हाला मुख्य कॅनाल रिकामा दिसणार नाही. वर्षभर दहिगाव उपसाचे पाणी या चारीत दिसेल, असा आरोप त्यांनी केला.
सरफडोह येथे गावभेट दौऱ्यावेळी पांडूरंग वाळके, माजी सभापती अतुल पाटील, माजी सरपंच कांतीलाल घोगरे, माजी सरपंच दादा पाटील, सोसायटीचे सदस्य सुभाष पवार, माजी सरपंच महादेव नलावडे, रामभाऊ बोंद्रे, श्रीरंग गवारे, नाथराव रंदवे, रामदास पवार, रामभाऊ मोरे, मारुती यादव, पोलिस पाटील अंकुश खरात, मनोहर रंदवे, जगन्नाथ गायकवाड, भानुदास शिंदे, सचीन मस्कर, स्वीय सहाय्यक सुर्यकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नाथराव रंदवे यांनी प्रास्ताविक केले तर सरपंच पांडुरंग वाळके यांनी आभार मानले.