करमाळा (अशोक मुरूमकर) : टाळ- मृदूंगाचा गजर… फुलं व भंडाऱ्याची उधळण… रांगोळीच्या पायघड्या… आणि वरुणराजाकडून अभिषेक होऊन शेकडो वर्षाची परंपरा असलेला श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आज (रविवारी) सोलापूर जिल्ह्यात (रावगाव) आगमन झाले. अत्यंत भक्तीमय वातावरणात स्वागत होताच रिमझिम पावसाने हजेरी लावली. आमदार नारायण पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह गावकरी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा हद्दीवर पालखीचे स्वागत झाल्यानंर पावसाच्या हलक्या सरींमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या भक्तिभावाने वैष्णवांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात रावगाव येथे हा पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावला. विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, पारंपारिक वेशभूषेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, डीजे व पारंपरिक वाद्यांच्या तालात गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी गावात पालखीचे भव्य स्वागत केले. प्रशासनाने वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध केल्या होत्या. पालखी तळावर येताच पुन्हा रिमझिम पाऊस सुरु झाला. त्यानंतर सुविधा मंडपात वारकरी गेले आणि आरती झाली. पोलिस निरीक्षक रणजित माने, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, बाल विकास अधिकारी किरण सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते. महिलांसाठी सरकारकडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती येथील हिरकणी कक्षात देण्यात आली होती. सोमवारी सकाळी येथून ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. करमाळ्यात वारकऱ्यांचा नेहमीप्रमाणे नाश्ता असणार आहे.
शेगूड येथील मंदिरात खंडेरायाचे दर्शन झाल्यानंतर अहिल्यानगर प्रशासनाने पालखी सोहळ्याला दुपारी २ वाजता भावपूर्ण निरोप दिला. त्यानंतर करमाळा प्रशासनाने पालखीचे स्वागत केले. रावगावमध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती. पाऊस सुरु झाल्यानंतर वारकऱ्यांनी रेनकोट व छत्री घेऊन थांबले. पाऊस थांबताच पुन्हा वारकरी हरिनामाचा गजर करत दिंड्यातील पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाला लागले.
पहिलीच नोकरी, पहिलीच वारी
करमाळा नागरपालिका, पंचायत समिती, पाणी पुरवठा विभाग यासह प्रशासनात पहिल्यांदाच नोकरी लागल्यानंतर पहिल्याच वारीत वारकऱ्यांची सेवा करण्याची जबाबदारी घेलटलेल्या काही तरुणी आज वारीच्या स्वागतासाठी आल्या होत्या. एकाच रंगाची साडी परिधान केलेल्या या तरुण वारकऱ्यांनी लक्ष वेधले. वारीतील हा आनंद उत्साह वाढवणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
चुकलेल्या वारकऱ्याला मदत
रावगाव येथे मुक्कामासाठी संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा विसावला. तेव्हा रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे काहीवेळ वारकऱ्यांची निवारा शोधण्यासाठी धावपळ झाली. दरम्यान काही वारकऱ्यांचे सहकारी चुकले होते. त्यातील एका वारकऱ्याला त्याचे सहकारी सापडत नव्हते. त्यांनी मला ‘या’ नंबरवर फोन लावून द्या’, अशी विनंती केली. तेव्हा बाल विकास अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी त्यांना मदत केली. तेव्हा घेतलेले छायाचित्र.
क्षणातच गर्दी गायब
वरकऱ्यांसाठी पालखीच्या मुक्कामस्थळी मुख्यमंत्री सुविधा मंडप उभारण्यात आला आहे. पालखी तळाजवळच हा मंडप आहे. तेथे पालखी आली तेव्हा गर्दी झाली होती. मात्र पालखी जवळ येताच पाऊस सुरु झाला. त्यामुळे क्षणातच संपूर्ण गर्दी कमी झाली आणि वारकऱ्यांनी मिळेल तेथे आसरा घेतला. त्यावेळी घेतलेले छायाचित्र.