सोलापूर : जिल्ह्यातील उजनीचे पाणी धरणग्रस्तांसाठी राखून ठेवा व जूनपर्यंत उजनी बॅक वॉटर तसेच भीमा सिना जोडकालवा परिसरातील शेतीपंपाना अखंडीत वीजपुरवठा द्या; अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी आमदार पाटील म्हणाले, उजनी धरणामध्ये सध्या ९ टीएमसी पाणीसाठा आहे. मृत पाणी साठा म्हणून असलेल्या २० टीएमसी पाण्यात गाळाचे प्रमाण जादा असल्याने हे पाणी शेतीसाठी वापराने कठीण आहे. आता उजनीमध्ये पाणी येण्याचा कोणताही उपाय नाही. त्यामुळे आहे ते पाणी जूनपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो. परंतु उजनी धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी वापरता यावे म्हणून आगामी काळात वीज पुरवठा तोडला जाऊ नये. उजनीचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात येणार असल्याच्या निर्णयावरून या अगोदर अनेकदा जिल्हाधिकारी यांनी उजनी बॅक वॉटर परिसरातील शेती पंपांची वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश महावितरणला दिले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. या परिसरात राज्यातील सर्वाधिक केळी लागवड असून वीजपुरवठा खंडित केल्यास करोडो रुपयांचे नुकसान होईल. संभाव्य निर्णयात आताच बदल केला जावा, असे ते म्हणाले.