करमाळा (अशोक मुरूमकर) : हिवरवाडी- वडगाव उत्तर व रावगावला जोडणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. यासाठी ४ कोटी ६२ लाख मंजूर आहेत. काम सुरु झाले तेव्हा रस्ता होत असल्याचा आनंद होता मात्र कामाचा दर्जा पाहिल्यानंतर आता नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हे काम पाहिल्यानंतर मात्र लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी नेमकं करतात काय? असा प्रश्न पडतो. निकृष्ट काम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांकडून मात्र ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलसमोर रस्त्याची पोलखोल केली. यामध्ये मात्र वास्तव पाहिल्यानंतर पहिल्यांदाच काम झालेल्या रस्त्यावर भर पावसात मुरुमावर डांबरी टाकली असल्याचा इतिहासच झाला असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार संजयमामा शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालत असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे.
करमाळा तालुक्यातील हिवरवाडी- वडगाव उत्तर व रावगावला जोडणारा हा रस्ता आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा रस्ता! मात्र हे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. रस्त्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करत आहे परंतु तेच काम व्यवस्थित होत नसेल तर सरकारचा उद्देश साध्य होईल का? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील हा रस्ता आहे.
या भागात ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. ऊस गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर येथून सतत जड वाहतूक सुरु असते. या रस्त्याचे काम अजून सुरु आहे. पुढे काम सुरु असताना त्यांच्याच खाडी वाहणाऱ्या वाहनाने रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. आताच ही परिस्थितीत असेल तर पुन्हा ऊस वाहतूक सुरु झाल्यानंतर रस्ता कसा होईल याची चिंता नागरिकांना आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. यासाठी आंदोलनही केले जाणार असल्याचे ते सांगत आहेत. डोळ्यादेखत निकृष्ट काम होत असताना याबाबत अधिकारी मात्र ठोस भूमिका घेत नाहीत. फक्त खराब काम झाले आहे तेथे पॅच टाकला जाईल, असे सांगितले जात असल्याने नागरिकांच्या भावना तीव्र आहेत.
४ कोटी ६२ लाख रुपये या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलकडे नागरीक भावना व्यक्त करत असताना आमदार संजयमामा शिंदे यांनी फोनद्वारे सीए लहू काळे यांच्याशी संवाद साधून काम चांगले होण्याबाबत आपण यामध्ये लक्ष घालत असल्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या या रस्त्याचे काम पुन्हा होणार का? याकडे आता लक्ष असून काम चांगले कसे करता येईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे नागरिक सांगत आहेत.