करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे. लोकसभेचा निकाल स्वीकारून सर्व इच्छुक विधानसभेच्या तयारीला लागले. विधानसभा जवळ येत असल्याने प्रमुख नेत्यांचे दौरेही वाढले आहेत. पहिल्यांदाच निवडणुकीत उतरणाऱ्यांकडूनही मोर्चेबांधणी सुरु आहे. या निवडणुकीत किती उमेदवार असतील आणि त्याचा कोणाला फायदा व कोणाला तोटा हे पहावे लागणार आहे.
करमाळा तालुक्यात जगताप, बागल, पाटील व शिंदे हे पारंपरिक गट आहेत. प्रा. रामदास झोळ यांनीही या निवडणुकीत उतरण्यासाठी रणनीती आखली आहे. गावागावांमध्ये त्यांनी संपर्क वाढवला आहे. त्यांच्या पत्नी माया झोळ या देखील प्रचारात उतरल्या असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचाही पर्याय होऊ शकेल, अशी स्थिती आहे.
लोकसभा निवडणुकीत चित्र वेगळे होते. आता विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक नेत्याने चाचपणी सुरु केलेली आहे. जगताप गट किंगमेकरच्या भूमिकेत राहील का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. जगताप गटाची नेमकी भूमिका काय असेल याचा अजूनही कोणाला अंदाज आलेला नाही. त्यांच्या भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र ठाम अजूनही त्यांच्या भूमिकेबाबत काहीच स्पष्ट होत नाही.
माजी आमदार जयवंतराव जगताप हे जगताप गटाचे प्रमुख नेते आहेत. ते जी भूमिका घेतली तीच त्यांचे कार्यकर्ते मानतात. लोकसभा निवडणुकीत चित्र कसे होते हे सर्वांनी पाहिले आहे. माजी नगराध्यक्ष वैभराजे जगताप यांनी उघडपणे मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत युवा नेते शंभूराजे जगताप यांच्यावर पक्षाने कारवाई केली. त्यावर त्यांनी भूमिकाही मांडली होती. कारवाई झाल्यानंतरही शंभूराजे जगताप यांनी त्यांचे काम काम सुरूच ठेवले. पक्ष असो व नसो त्यांनी त्यांच्या कामातून ओळख निर्माण केल्याचे दिसते.
कुगाव- चिखलठाण- शेटफळ- जेऊर रस्त्यासाठी केलेले आंदोलन हा देखील चर्चेचा विषय होता. या रस्त्याच्या उदघाटनावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे नाव होते. कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचा फोटोही होता. आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते हे उदघाटन झाले होते. मात्र या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले नाहीत. शिंदे गटाकडून माजी आमदार जगताप यांचा फोटो प्रत्येक बॅनरवर घेतला जात आहे. परंतु वास्तवात जगताप यांची भूमिका शिंदे गटाबाबद्दल काय आहे यावरच राजकीय वर्तुळात प्रश्न केला जात आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे नुकतेच करमाळा दौऱ्यावर आले होते. तेव्हा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी आमदार जगताप व खासदार मोहिते पाटील यांची भेटही झाली होती. चिखलठाण येथील कार्यक्रमानंतर झालेली ही भेट महत्वाची मानली जात होती. त्यानंतर झरे फाटा येथे माजी आमदार नारायण पाटील यांचे वडील कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या चतुर्थ पुण्यसमरण कार्यक्रमाला जगताप हे उपस्थित राहिले. ‘२०१९ ला तिरके चाललो पण आता तसं होणार नसल्याचे’ म्हणत त्यांनी सूचक विधान केले.
पाटील व जगताप यांची जवळीक वाढलेली दिसत असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु असतानाच युवा नेते शंभूराजे जगताप व एका कार्यकर्त्यांचा एका ‘ऍडिव्ही’ व्हायरल झाला. ‘जगताप गट पाटील गटाला पाठींबा देणार असल्याची चर्चा असल्याचे कार्यकर्ता शंभूराजे जगताप यांना सांगता होता. त्यावर शंभूराजे जगताप म्हणत होते की असं काहीही नाही. उलट पाटील गटच आपल्याला पाठींबा देणार आहे. अशी बातमी संबंधित पत्रकाराला देईला सांगा’ असे म्हणत जगताप यांच्या या विधानाने पुन्हा वेगळी चर्चा सुरु झाली. यावरूनही जगताप गट कोणती भुमीका घेणार हे स्पष्ट झाले नाही. मात्र जगताप गटाने शंभराजे जगताप यांचा भावी आमदार असा उल्लेख केलेले बॅनरही व्हायरल झाले. त्यावरून त्यांच्या भूमिकेचा अंदाज आलेला नाही.
प्रा. रामदास झोळ यांनीही माजी आमदार जगताप यांची भेटीसाठी वेळ मागितली होती. काही दिवसांपूर्वी शंभूराजे जगताप व प्रा. झोळ हे देखील एकत्र आले होते. कुगाव जेऊर रस्त्याच्या आंदोलनानंतर प्रा. झोळ व शंभूराजे जगताप हे पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यांचेही फोटो सोशल मीडियावर आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी आमदार जगताप यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचीही भेट घेतली होती. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप गटाची नेमकी भुमीका काय असेल हे निश्चित पहावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत जगताप, बागल, पाटील व शिंदे हे गट स्वतंत्र लढले तर खरी कोणाची किती ताकद आहे हेही स्पष्ट होणार आहे. मात्र आणखी कालावधी जाणार आहे. त्यात कशी समीकरणे जुळणार हे पहावे लागणार आहे. शंभूराजे जगताप हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. बागल गटाचे तयारीचे दौरे सुरु आहेत. शिंदे व पाटील गट यांच्यात खरी लढत होईल, असे मानले जात आहे. यात प्रा. झोळ यांचा कसा फायदा होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. जगताप गटाने आता ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे.