करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात येत असलेल्या उग्र वासाचा अखेर शोध लागला आहे. पशुवैद्यकीय रुग्णालय येथे अनेक दिवसांपासून भांडारात राहिलेली औषधे नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु होती. मुदत संपलेल्या सर्व औषधांना जाळून नष्ट केले जात आहे. त्याचा उग्र वास येत असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावर आता नियंत्रण आणण्याचे काम सुरु झाले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी यामध्ये तत्काळ लक्ष घालून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. लवकरच वास जाऊन शुद्ध हवा येईल, असे सांगितले जात आहे.
करमाळा शहरात उग्र वास येत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर हा वास नेमका कशाचा आहे याचा शोध सुरु होता. दरम्यान पशुवैद्यकीय रुग्णालय परिसरात धूर येत असल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर तेथे पहाणी करण्यात आली तेव्हा अनेक दिवसांपासून पडून असलेली आणि मुदत संपलेली औषधे पशुविभागाकडून नष्ट केली जात असल्याचे सांगण्यात आले. हा औषधसाठा मोठा होता आहे. खड्डा खोदून त्याला जाळण्यात येत आहे. मात्र त्याची आग लगेच्यालगी विजली नाही. त्यामुळे त्यातून धूर येत होता आणि त्याचा वास सर्वत्र पसरला असावा, असा अंदाज आहे.
करमाळकरांचा श्वास गुदमरला! हवा प्रदूषित झाल्याने नाकाला रुमाल; काय घ्याल काळजी?
तक्रारी आल्यानंतर मुख्याधिकारी तपसे यांनी हा वास कशाचा आहे याचा शोध यंत्रणेमार्फत सुरु केला होता. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांच्याशी संपर्क साधून ‘हवे असल्यास आमची यंत्रणा मदतीला घ्या’ पण ही आग त्वरित विझवण्याची सूचना केली आहे. त्यानंतर डॉ. यादव यांनीही तत्काळ यावर कारवाई सुरु केली असून हा वास लवकरच जाईल, अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.
