माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अभयसिंग जगताप यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांनी करमाळ्यात एकाच आठवड्यात तीन कार्यक्रम घेतले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला असल्याचे दिसले. मात्र याचा राजकीय दृष्ट्या कसा परिणाम होणार आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्याच निमित्ताने ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने घेतलेला हा आढावा…
लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशी उमेदवारांची उत्सुकता निर्माण होऊ लागली आहे. भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून नावे चर्चेत असताना महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी असेल, अशी चर्चा निर्माण झाली होती. त्यात अभयसिंग जगताप यांनी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
जगताप यांनी मतदारसंघाचा दौरा सुरु केला आहे. त्यात करमाळ्यातील कार्यक्रमामुळे त्यांचे नाव घराघरात पोहोचण्यासाठी मदत झाली आहे. सुरुवातीला जगताप यांच्या नावाने करमाळा येथे क्रिकेट स्पर्धा झाली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांनतर लगेच जगताप यांनी महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला. पहिल्यादिवशी वेळेच्या बंधनामुळे कार्यक्रम अर्ध्यातून बंद करावा लागला होता. हजारो महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. त्यावर अतिशय शांतपणे निर्णय घेऊन त्यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य केले. आणि एवढ्या जनसमुदयापुढे अतिशय शांतपणे कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे उपस्थित आणि प्रशासनामध्येही त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली. समंजसपणा त्यांनी लगेच दुसऱ्यादिवशीही कार्यक्रम घेण्याची त्यांनी घोषणा केली. याचा त्यांना दुहेरी फायदा झाला. पहिल्यादिवशी ज्या महिलांना उपस्थित राहता आले नाही त्या महिला या कार्यक्रमासाठी आल्या.
करमाळा तालुक्यातील अपवाद सोडला तर सर्व गावातून महिला या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रतिसाद पाहून जगताप कोण आहेत याची चर्चा सुरु झाली. कार्यक्रमावेळी निवेदकाकडून जगताप यांना बळ देण्याचे आवाहन करण्यात आले त्यालाही उपस्थितांकडून हात वर करून प्रतिसाद मिळत होता. याचा फायदा जगताप यांच्या वातावरण निर्मितीसाठी होणार आहे.
जगताप यांचा राष्ट्रवादीचा हा तसा करमाळ्यातील गेल्या काही दिवसातील पहिलाच मोठा कार्यक्रम होता. त्यामुळे नवख्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढणार आहे. संतोष वारे यांच्या निवाससस्थानी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे येऊन गेल्या होत्या. त्यानंतर जगताप हे करमाळ्यात आले होते. आमदार निलेश लंके यांनीही निवडक कार्यकर्त्यांशी करमाळ्यात संवाद साधला होता. कोणताही मोठा नेता आलेला नसताना जगताप यांच्या कार्यक्रमाला करमाळ्यात गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा ते कसा करून घेतील हे पहावे लागणार आहे. हा संपुर्ण कार्यक्रम होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी वारे, नलिनी जाधव, राजश्री कांबळे, जयमाला चवरे शेवटपर्यंत उपस्थित होत्या.