करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकासाठी लागलेल्या निवडणुकीत २७२ अर्ज मंजूर झाले आहेत. मात्र आता कोण माघार घेणार आणि कोणता गट कोणावरोबर एकत्र येणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. त्यात बागल व शिंदे एकत्र येतील याची जास्त चर्चा आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा करमाळा तालुक्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. हा कारखाना बंद आहे तरीही प्रमुख गटांना या कारखान्यात सत्ता हवी असते. आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप हे या निवडणुकीत उतरले आहेत. मकाई सहकारी साखर कारखान्याप्रमाणे बागल कुटुंबातील या निवडणुकीत कोण उतरले नाही. पण त्यांचे समर्थक माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांच्यासह प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली ३० इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आणखीन रंगत आली आहे. अर्ज मागे घेण्यासाठी २ एप्रिलपर्यंत मुदत आहे. त्यामुळे कोणाचे अर्ज निघणार आणि कोण कशी निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विधानसभा निवडणुकीनंतरची करमाळ्यात ही पहिलीच निवडणूक होत आहे. पाटील व जगताप हे गट एकत्र निवडणुकीत उतरतील. मात्र त्यांच्यात कोणाला किती जागा दिल्या जाणार हे पहावे लागणार आहे. मोहिते पाटील व सावंत गट यांचादेखील यात महत्वाच्या भूमिका राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढलेले बागल व शिंदे हे एकत्र येणार अशी तालुक्याच्या राजकारणात जोरदार चर्चा असून ते कसे एकत्र येतील हे पहावे लागणार आहे.
महायुतीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन या निवडणुकीत उतरावे, असे आवाहन शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केले होते. बागल व शिंदे हे सध्या महायुतीमध्येच आहेत. मात्र जागा वाटप आणि नेत्यांची मध्यस्थी यामध्ये महत्वाची ठरणार आहे. भाजपला देखील या निवडणुकीत उतरणार असून त्यांना किती जागा दिल्या जाणार आहे, हे पहावे लागणार आहे.
जगताप यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रा. झोळ यांनी कारखाना बिनविरोध करण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र त्याचे पुढे काय होणार याच्या चर्चा तालुक्याच्या राजकारणात सुरु आहेत.