Along with Yashwantrao Namdevrao Jagtap should also be credited for the economic growth of SolapurkarAlong with Yashwantrao Namdevrao Jagtap should also be credited for the economic growth of Solapurkar

मान्सुनचे आगमन झाले की सगळ्यांना आपल्या गावात, आपल्या भागात पाऊस कधी सुरु होईल याचीच काळजी लागलेली असते. सोलापूरवासीयांना मात्र आस लागते ती पुण्यातल्या पावसाची! सोलापूर जिल्ह्यातली माय आपल्या पुण्यात शिकणाऱ्या पोराला जेवला का? विचारते पण त्याचा बाप त्याची ख्यालीखुशाली विचारण्याआधी पुण्यात पाउस पडला का? अस विचारतो. का बर सोलापूरच्या माणसांना पुण्याच्या पावसाची एवढी काळजी? त्याचे कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण! जे पुण्यातुन वाहत येणाऱ्या भीमा नदीवर बांधलं आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी १९६४ मध्ये मोठ्या कल्पकतेन हे धरण बांधायला घेतले. जवळपास १२१ टीएमसी इतकी साठवण क्षमता असलेल्या या धरणाने सोलापूरकरांचे अक्षरशः नशीबच पालटले. एकेकाळी ज्वारीच कोठार म्हणून ओळखल्या जाणऱ्या दुष्काळी जिल्ह्यात उजनीच पाणी आले आणि गावे झपाट्याने बदलली, देशातले सर्वाधिक साखर कारखाने उभे राहिले, शेती वाढली, पीकं बदलली. त्यामुळेच हे धरण म्हणजे आजघडीला सोलापूरच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण एकवेळ, अशी होती की हे धरण सोलापूरमधील माढा तालुक्याऐवजी पारेवाडीमध्ये उभे राहणार होते. मात्र दिवंगत देशभक्त नामदेवराव जगताप यांनी आपली संपुर्ण राजकीय ताकद वापरुन या धरणाची जागा बदलून घेतली होती.

नामदेवराव जगताप म्हणजे, स्वातंत्र्य सैनिक. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा वाटा न विसरता येण्यासारखा आहे. सोबतचं सोलापूर कॉंग्रेसमधील एकदम दिग्गज नाव! संबंध जिल्ह्यात त्यांनी कॉंग्रेस रुजवली आणि वाढवली देखील. त्यांच्यामुळे जिल्ह्यात अल्पावधीत कॉंग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले. सोबतच यशवंतराव चव्हाणांचे निकटवर्तीय. ते सोलापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष देखील होते. पुढे जावून कॉंग्रेसचे आमदार पण झाले. त्यामुळे त्याकाळी अगदी नामदेवराव जगतापांच्या घरातुन सोलापूर कॉंग्रेसची सगळी सुत्र हालायची असं म्हंटल्यास वावग ठरणार नाही.

यशवंतरावांनी राजकारणाची सुत्र हातात आल्यापासूनच पाणी व दुष्काळी प्रदेशाच्या, मागासलेल्या प्रदेशातल्या शेतीच्या प्रश्नांची फार आस धरलेली होती. बर्वे कमिशन तसेच पाणी- प्रश्नाची व दुष्काळी कोरडवाहू शेतीला निदान दोन- तीन पाण्याच्या व्यवस्थेची रचना नव्या योजना आखून केली जात होती. यातुनच त्यावेळी केंद्रात मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पक दृष्टीतून उजनी धरण उभारणीची संकल्पना पुढे आली. त्यावेळी धरणाची साईट दौंड तालुक्यातील पारगाव/ पारेवाडीजवळ फायनल झाली होती. परंतु सोलापूर हा दुष्काळी जिल्हा म्हणून त्याकाळी देखील महाराष्ट्रात परिचित होता, त्यामुळे या भागाची प्रगती व्हावी, सोलापूर व त्याखालील भागालाही पाण्याचा उपयोग व्हावा या उदात्त हेतूने नामदेव जगताप यांनी हे धरण सोलापूरमध्ये व्हावे, अशी मागणी त्यावेळी लावून धरली.

त्यावेळी यशवंतराव चव्हाणांची भेट घेवून त्यांनी या भागातील या धरणाची आणि पाण्याची गरज समजावून सांगितली. आपली संपूर्ण राजकीय ताकद वापरली. यशवंतरावांची बेरजेच राजकारण करणारा नेता ही ओळख नंतरची. पण आधी विकासाचं राजकारण नेता ही ओळख होती. त्यातुन नामदेवरावांची मागणी हि देखील विकासाची होती. सोलापूरच्या दुष्काळाशी यशवंतराव देखील परिचीत होते. अखेरीस नामदेवराव जगताप यांची मागणी मान्य झाली. धरणाची साईट माढा तालुक्‍यातील भीमानगरमध्ये हलवण्यात आली. आज सोलापूरसोबतचं मराठवाड्यालादेखील उजनीचे पाणी मंजूर केले आहे.

खरतरं धरण होणार अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा कोणाला खरं वाटत नव्हतं. या भागात तेव्हा त्याबाबत पुरेशी जागृती देखील नव्हती. त्यामुळे धरण होणार यावर कोणाचाही विश्‍वास बसला नाही. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष जमीनींच अधिग्रहण सुरू झाले, धरणाचे भुमिपूजन झाले, तेव्हा काही तरी होणार अशी आशा सोलापूरवासीयांना वाटू लागली. पुढे या धरणाचे काम सुरू झाले.

भुमिपूजनाचा प्रसंग देखील अत्यंत भावनिक असा होता. केंद्रात मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत भुमिपूजनाचा सोहळा पार पडला. नाईक यांनी नारळ वाढवला आणि यशवंतराव चव्हाण कुदळ मारण्यासाठी पुढे झाले. अन् त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. धोतराचा सोगा डाव्या हाताने उचलून धरत त्यांनी कुदळ खाली टाकली. थोडेसे पुढे सरसावले. नदीपात्राच्या दिशेने दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. गदगदलेल्या आवाजात ते बोलले, ‘विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे!’

यशवंतराव पुढे विठ्ठलालाच उद्देशून म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी दरसाल आषाढी कार्तिकी एकादशीला खांद्यावर पताका टाकून ‘ग्यानबा- तुकाराम’ म्हणत म्हणत तुझ्या दाराशी येत असतो. त्या ग्यानबा– तुकारामाच्या शेतीत आणि झोपडीत विठ्ठला, आता तू जा. तिथे तुझ्या चंद्रभागेला तू भेट. जनाबाईच्या मदतीला तू धावून गेलास आणि तुझी भक्ती करणाऱ्या तुझ्या सगळ्या भक्तांच्या मदतीलाही तू धावून गेलास. तशीच तुझी भक्ती करणाऱ्या महाराष्ट्राच्या झोपडीत गरीब शेतकऱ्याने आज तुझी चंद्रभागा अडविली आहे. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मदतीसाठी विठ्ठला, तू त्यांच्या शेतीत जा. तू आता पंढरपूरच्या मंदिरात राहू नकोस. विठ्ठला, मीही मनोमन प्रार्थना केली आहे. तुकारामाची, ज्ञानेश्वराची, एकनाथाची आठवण करून मी ही प्रार्थना केलेली आहे.

पुढे तिथे उभ्या असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नेत्यांना यशवंतराव सगळ्यांना म्हणाले, कृपा करून आपण हे मात्र लक्षात ठेवा की निव्वळ प्रार्थनेनं हे सगळं घडणार नाही. त्यासाठी तुमच्या कष्टाची गंगा उपसावी लागणार आहे. त्यासाठी जिद्दीनं काम करण्याचा आपण निश्चय करू या. पुढे १९८० साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. म्हणजेच या धरण बांधणीला तब्बल १६- १७ वर्षाचा इतका मोठा कालावधी लागला. पण त्यानंतर सोलापूर जिल्हा बदलला तो कायमचाचं. मुबलक पाणी आल्यामुळे पुण्या- मुंबईत गेलेली पोरं माघारी फिरली. इथं आता फक्त ऊसच नाही तर केळी, बोर, डाळिंब, द्राक्ष, कांदा या पिकांचही उत्पादन उजनीच्या पाण्यावर सोलापूरचे शेतकरी घेतात. आणि फक्त शेतीच नाही तर सोलापूर शहराची तहानही उजनी भागवते. (संबंधित स्टोरी मी ‘सकाळ’मध्ये असताना केली होती. कृषी भूषण आंनद कोठडीया यांनी अनेक आठवणी सांगितल्या आहेत. त्यानंतर या स्टोरीचा संदर्भ अनेक ठिकाणी देण्यात आला.)
अशोक मुरूमकर

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *