करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. आता कोणत्या गटाचा कोण उमेदवार असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. निवडणूक रिंगणात जगताप गटाविरुद्ध कोणता गट स्वतंत्र उतरणार की कोणाबरोबर कसे एकत्र येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत जगताप, बागल, सावंत, चिवटे व देवी गटाची भूमिका महत्वाची राहणार आहे. आमदार नारायण पाटील व माजी आमदार संजयमामा शिंदे हे काय निर्णय घेतील ते पहावे लागणार आहे. या निवडणुकीत जगताप गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे.
करमाळा नगरपालिकेच्या निवडणूक इतिहासात तीस वर्षात शहरवासीयांचा कल जगताप गटाकडे असल्याचे दिसले. थेट नागिकांमधून नगराध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत २००१ मध्ये जगताप गटाच्या सुनिता वाशिंबेकर व २०१६ मध्ये वैभवराजे जगताप विजयी झाले होते. जगताप गट कधी स्वतंत्रपणे तर कधी स्थानिक पातळीवर सावंत गट व नागरिक संघटना अथवा बागल गटाबरोबर आघाडी करून राजकारणात केंद्रस्थानी राहिला आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांची निरुपद्रवी, जातीपाती विरहित, दहशतवाद मुक्त सामाजिक स्वास्थ्य टिकविण्याची भूमिका असलेले समाज कारण- राजकारण यामुळे शहरातील नागरिकांचा जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे दिसले.
गिरधरदास देवी यांच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घकाळ सत्तेत असणाऱ्या नागरिक संघटनेची सत्ता उलटवून तत्कालीन आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटाने नगरपालिकामध्ये सत्ता हस्तगत केली. २०२१ पर्यंत अबाधित होती. चार वर्षापासून नागरपालिकेमध्ये प्रशासक आहे. खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्षपद असताना मुस्लिम समाजातील शौकत नालबंद यांना जगताप गटाने नगराध्यक्षपदाची संधी दिली होती. जगताप गटाचे नेतृत्वाखालील नगरपालिकेच्या सत्ता काळात ॲड. डी. पी. जगताप, सुशीला आगलावे, ज्ञानेश्वर मोरे, पुष्पा फंड, विद्या चिवटे, अमोदकुमार संचेती, दीपक ओहोळ, प्रशांत ढाळे (प्रभारी) आदींनी नगराध्यक्षपद भूषविले.
येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी थेट नागरिकांमधून होणाऱ्या नगराध्यक्षपदीपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी जाहीर झाले आहे. माजी आमदार जगताप आता जगताप कुटुंबातील महिलेला नगराध्यक्षपदाचे निवडणुकीत रिंगणात उतरवणार की एखाद्या सक्षम कार्यकर्त्याला संधी देणार याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. माजी आमदार जगताप यांनी त्यांच्या राजकीय जीवनात बऱ्याच वेळा राजकीय धक्का तंत्राचा अवलंब करीत मुत्सद्देगिरीने निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे जगताप यांच्या निर्णयावरच पुढील सर्व राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.