करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होऊन १५ दिवस झाले आहेत. आता सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून नेमके सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगताप गटाचे माजी आमदार जयवंतराव जगताप व जगताप गटाचे शंभूराजे जगताप या दोघांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे. यामध्ये बागल व पाटील गटाला प्रत्येकी दोन, सावंत गटाला एक जागा मिळाली आहे. तर १३ जागा जगताप गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे जगताप गटाचा सभापती होणार हे निश्चित आहे. मात्र जयवंतराव जगताप की शंभूराजे जगताप या दोघांपैकी कोण सभापती होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
बाजार समितीवर सुरुवातीपासूनच जगताप गटाचे वर्चस्व राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार १९४८ ला स्थापन झालेल्या या बाजार समितीचे पाहिले सभापती म्हणून कै. पांडुरंग जगताप यांनी काम पाहिले होते. त्यानंतर कै. अब्दुल रहिमान छोटुमिया (पंजाब वस्ताद) यांनी काम पाहिले. १९५९ पासून १९८४ पर्यंत स्व. नामदेवराव जगताप यांनी काम पाहिले होते. त्यांनतर निंभोरे येथील पन्नालाल लुणावत यांनी काम पाहिले होते. १९८९ पासून २०१८ पर्यंत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व त्यानंतर प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी सभापती म्हणून काम पाहिले आहे. या बाजार समितीची आता निवडणूक झाली असून सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी नेमके कोण सभापती होणार हे पहावे लागणार आहे.