करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू असून या आवर्तनाचे पाणी अजूनही टेल भागामध्ये पोहोचले नाही. पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार पाणी टेल टू हेड पद्धतीने दिले जाते. मात्र आमदार नारायण पाटील यांनी या योजनेचा बोजवारा उडवला असून योजना सुरू होऊन तीन आठवडे झाले तरीसुद्धा अजून घोटी या गावासह इतर गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विलास राऊत म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आमदार पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कॅनॉलवर फिरूनही त्यांना दहिगाव योजना चालवता येत नाही. १० पंप असलेली योजना चालवता येत नसेल तर त्यांच्या हातात आदिनाथ कारखाना गेल्यानंतर ते कारखाना कसा चालवतील? असा प्रश्नही त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. ते म्हणाले, पंचवार्षिकमध्ये प्रत्येक वर्षी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी दिले जात होते. त्यामुळे उन्हाळी आवर्तन 100 दिवस चालवले जायचे. या सातत्यपूर्ण पाण्यामुळे दहिगाव पट्ट्यातील शेतकऱ्यांचा विश्वास या योजनेवर बसला आणि या शेतकऱ्यांनी पाईपलाईन, शेततळी हे करण्याबरोबरच केळी आणि तरकारी , फळबाग, ऊस अशी बारमाही पिकांसाठी कोट्यावधीची गुंतवणूक केली आणि तसे उत्पन्नही या शेतकऱ्यांना मिळाले. परंतु पाटलाच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका 24 गावातील शेतकऱ्यांना बसणार असून प्रत्यक्ष या शेतकऱ्यांच्या पिकांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
दहिगावच्या पाण्यासाठी 15 तारखेला रस्ता रोको
टेल भागाला पाणी मिळावे यासाठी सरपंच रवींद्र वळेकर यांच्या नेतृत्वाखाली 7 एप्रिलला होणारे रास्ता रोको आंदोलन पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते. परंतु अद्यापही टेल भागामध्ये पाणी पोहोचलेले नाही. लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेटीस धरणाचे काम करत आहेत. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत टेल भागात पाणी न पोहोचल्यास 15 तारखेला रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे.