करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळी समीकरणे मांडली जाऊ लागली आहेत. कोणामुळे लीड कमी झाला आणि कोणामुळे लीड वाढला यावर चर्चा केली जात आहे. करमाळ्यातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य कमी मिळालेले आहे. तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना जास्त मताधिक्य मिळाले आहे. मात्र याची कारणे नेमकी काय आहेत? तुम्हाला कोणते कारण महत्वाचे वाटते तेही आम्हाला कळवा.
मोहिते पाटील यांना यामुळे मिळाले मताधिक्य?
- मराठा आरक्षणाचा परिणाम : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन केले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मराठा समाजाची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबाजवणी झाली नाही. आंदोलनादरम्यान झालेल्या प्रसंगाने सरकारबदल चीड. यामुळे स्थानिक गटातटाचे राजकारण विसरून भाजपविरोधी मतदान झाले.
- फोडाफोडीचे राजकारण : महाविकास आघाडी सरकार घालवण्यासाठी फडणवीस यांनी शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादीही फोडली. (अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा सरकारमध्ये सहभाग.) हे फोडाफोडीचे राजकारण जनसामान्यांना मान्य झाले नाही.
- मोदींविरोधी वातावरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतमालाला हमी भाव दिला नाही. दुधाला दर नाही महागाई वाढली अशी भावना ग्रामीण भागात तयार झाली. त्याचाही परिणाम निवडणुकीत झाला.
- स्थानिक मुद्दे : करमाळा विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांनी विकास कामे केली नाहीत. मोजक्या नेत्यांशी संपर्क ठेवला. जनसामान्य मतदारांशी संपर्क ठेवला नाही, असा आरोप करण्यात आला. उमेदवारीत मोहिते पाटील यांना भाजपने डावलले असल्याची भावना. मोहिते पाटील समर्थकांनी केलेले कामही महत्वाचे आहे.
माजी आमदार पाटील, जगताप, उपाध्यक्ष गुळवे, वारे, सावंत, प्रा. झोळ यांचा परिणाम
या निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांची संपूर्ण यंत्रणा काम करत होती. बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत. मात्र पाटील यांचे तर विरोधक होते. मात्र या निवडणुकीत त्यांच्या मदतीचाही फायदा मोहिते पाटील यांना झाला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे यांचाही पांडे जिल्हा परिषद गटात चांगला जनसंपर्क आहे. करमाळ्यात त्यांचा मित्रपरिवार आहे. त्यांचीही मदत या निवडणुकीत झाली आहे. करमाळ्याच्या राजकारणात सावंत गटाची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. त्यांनी मोहिते पाटील यांचे उघडपणे काम केले होते. जगताप गट हा करमाळा तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचा गट आहे. सावंत गट, जगताप गट (माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप) व सुभाष गुळवे तालुका पातळीवरील राजकारणात आमदार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांनी मोहिते पाटील यांचे काम केले. पुढे त्यांच्या भूमिका महत्वाच्या आहेत. प्रा. रामदास झोळ यांनी बागल गटाच्याविरोध मकाईची निवडणूक लढवली होती. त्यांनी पॅनल देण्याचा प्रयत्न केला होता. तालुक्यात तेही त्यांचा गट वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मतदानादिवशी अनेक मतदान केंद्रावर भेटी दिल्या होत्या. त्यांनी मोहिते पाटील यांचे काम केले होते. त्यांचाही परिणाम या निवडणुकीत झाला आहे. शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे यांनीही मोहिते पाटील यांचे काम केले होते. याशिवाय आमदार संजयमामा शिंदे व बागल गट हे निंबाळकर यांच्याबरोबर होते. मात्र अनेक कार्यकर्ते भाजपविरोधी होते. त्यामुळे त्यांचे मनपरिवर्तन करण्यात यश आले नाही. विधानसभेला याचा किती परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.