लोकसभा निवडणूकिचा प्रचार वेग घेऊ लागला आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्याचे मतदान आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी महाराष्ट्रात प्रमुख लढत होत आहे. वंचितने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. अशात काही जागांचे वाटप झाले असलं तरी अनेक ठिकाणी युती- आघाडीमुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीत अजुनही खलबत सुरु आहेत तर भापजने आतापर्यंत २० उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र इतर २८ जागांचे काय असा प्रश्न आहे. अनेक जागांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपमध्ये वाद सुरु आहे. त्यात स्थानिक राजकारणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही गोची होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपच्या महायुतीमध्ये मनसे येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तशा त्यांच्या बैठकही सुरु आहेत.
मनसेचा ‘एनडीए’मध्ये समावेश होण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरे व भाजप नेते अमित शहा यांची बैठकही झाली आहे. त्यानंतर नंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही मुंबईत बैठक झाली आहे. त्यावरून राज ठाकरे महायुतीत जाणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. पण आधीच अजित पवार यांची राष्ट्रवादी व शिंदे यांची शिवसेना सोबत असताना भाजपने आता मनसेला सोबत घेण्यामागचं कारण काय? यावर चर्चा सुरु झाली आहे.
दिल्लीत अमित शाह व भाजपचे जे. पी. नड्डा, महाराष्ट्र भाजप कोअर समितीचे सदस्य फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक झाली. राज्यातील उरलेल्या २८ जागांचे काय करायचे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये त्या जागांचे कसं वाटप करायचे यावर त्यांची चर्चा झाली. बैठकीनंतर फडणवीस, शिंदे व अजित पवार यांच्यासोबत बैठक होऊन त्यात महायुतीचा जागावाटपाचा सोक्षमोक्ष लागणार असल्याचं बोलले जात आहे आणि या सगळ्यात मनसे अध्यक्ष ठाकरे देखील दिल्लीत पोहोचले तसं पाहिलं तर चार दिवसांत राज ठाकरे हे दुसऱ्यांदा दिल्लीत गेले अशी चर्चा आहे.
मनसेला महायुतीत सामील करून घ्यायचे यासाठी भाजप आग्रही होते. आशिष शेलार आणि फडणवीसांनी यासाठी हालचाली केल्या होत्या. शेलार व राज ठाकरे यांची मैत्री सगळ्यांनाचा चांगलीच ठावूक आहे. काही दिवसांपुर्वीच राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त बैठकही झाली होती. या बैठकीत नेमकी कशासाठी होती याच कारण स्पष्ट झालं नाही. कारण याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते म्हणाले होते ‘माझा विषय वेगळा आहे. ज्यावेळी निवडणुकीवर बोलायचं आहे तेव्हा मी निवडणुकीवर बोलेल’, असं म्हणत विषय टाळला. पण, शेलारांनी ठाकरेंना केंद्रीय नेतृत्वाचा निरोप दिल्याचं बोललं आणि मनसे महायुतीत सामील होणार या चर्चा सुरु झाल्या.
राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा एकूणच भाजपविरोधात सुर आवळला होता. पंतप्रधानांविरोधात होणारी प्रखर टीका कुठेतरी कमी झाल्याचं दिसत होते. काही दिवसात फडणवीसांनी राज ठाकरेंशी मनसेच्या नेत्यांशी भेटीगाठी वाढवल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंच्या प्रश्नावर लवकर चित्र स्पष्ट होईल असं कोड्यात बोलून अनेक चर्चांना वाट करून दिली होती.
लोकसभा लढवायची नाही असं मत मनसेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याचे बोललं होते. यासाठी राज ठाकरेंनी मतदारसंघाचा आढावा देखील घेतला होता. यानंतर फडणवीसांनी संपर्क साधला. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याच्या चर्चा कोणापासून लपून राहिल्या नव्हत्या. यंदाच्या लोकसभेला निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात उतरायचे की भाजपला पाठिंबा द्यायचा यावर दोन्ही पक्षांचे नेते विचार करीत असल्याचं बोललं जातं. मनसेने दक्षिण मुंबई, रत्नागिरी आणि शिर्डी या तीन मतदारसंघांपैकी एक जागा लढविण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. मुंबईतील मराठी मतांच्या बेगमीसाठी दक्षिण मुंबईची जागा लढविणे महायुतीला उपयोगाचे ठरेल असे भाजपचे मत आहे. बाळा नांदगावकर येथून उभे राहिल्यास त्यांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो, असे बोललं जात आहे. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा उमेदवारी फिक्स असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून मनसेचा उमेदवार रिंगणात उतरला तर पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना पाहायला मिळू शकतो. आता भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असताना त्यामानाने संख्याबळ कमी असलेल्या मनसेची साथ कशासाठी हवी तर. लोकसभेनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकांकडे भाजपने लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसून येतंय आणि मनसेला सोबत घेऊन भाजप येणाऱ्या निवडणुकांना सामोरं गेल्याने भाजपला अर्थात फायदा होणार आहे. नाशिक, पुणे व मुंबई या भागांमध्ये मनसेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे तिथंही भाजपला एकूणच महायुतीला फायदा होणार आहे. एकंदरित येत्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेला मनसेचा महायुतीला फायदा होईल.