करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र आहे. मोहिते पाटील हे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील मात्र त्यापूर्वी उमेदवाराची यादी प्रसिद्ध झाली तर त्यांचे त्यात नाव येऊ शकते.
माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांचेच नाव आघाडीवर असून त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यासाठी शरद पवार यांची धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेतली असल्याची चर्चा आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर भाजपमधील मोहिते पाटील समर्थकांनी नाराजी व्यक्त करत उमेदवारीसाठी मतदारसंघात दौरा केला. तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून ‘तुतारी’ घेण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून झाली होती. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या आहेत.
मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत यावे, अशी भावना अनेकांची होती. त्यांच्या रूपाने महाविकास आघाडीला एक मोठा नेता मिळणार आहे. त्याचा परिणाम सोलापूर, सातारा, कोल्हापूर येथेही होऊ शकतो, अशी चर्चा आहे. शरद पवार गटाचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा करमाळा तालुका राष्ट्रवादीचे (शरद गट) संतोष वारे यांनी मोहिते पाटील यांच्याबाबत सकारात्मक माहिती दिली होती. दरम्यान लंके यांच्या प्रचाराच्या शुभारंभावेळी वारे यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माढा मतदारसंघाची माहिती घेतली होती, अशी चर्चा आहे.
माढा लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली तर चुरशीचा सामना होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली असून त्यांचे नाव प्रवेशापूर्वीच जाहीर होऊ शकते. पाडव्याच्या मागेपुढे त्यांचा प्रवेशही होईल, असे सांगितले जात आहे. याबाबत अधिकृत माहिती दिली जात नाही, मात्र कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह वाढला आहे.
मोहिते पाटील समर्थक डॉ. अमोल घाडगे म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु होता; त्यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केला आहे. ते जो निर्णय घेतली, तो आम्हाला मान्य असून त्यांच्या विजयासाठी आम्ही काम करणार आहोत. त्यांचा निर्णय काय होता याबाबत आम्हालाही उत्सुकता आहे. लवकरच हा निर्णय होईल.