सोलापूर : उमेद अभियानाचे जिल्ह्याचे 2022- 23 मधील कर्ज वाटपाचे उदिष्ट 212 कोटी होते. त्यानुसार 279 कोटीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. तसेच या आर्थिक वर्षात आतापर्यंत 33 कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे. उदिष्ट पूर्ततेपेक्षा महिलांच्या संसाराला हातभार लागला याचा जास्त आनंद आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी विविध व्यवसाय निर्मिती करून त्याचे मार्केटिंग करून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील 13 बचत गटांना 80 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. उमेदच्या वतीने बचत गटामधील महिलांना कर्ज वितरण प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते.यावेळी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते, सरपंच सुजाता पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर प्रवीण भोपळे, जिल्हा व्यवस्थापक दयानंद सरवळे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी म्हणाले, बचत गटाच्या महिलांनी दिलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून बँकेत पत निर्माण करावी.आज बचत गटांना कर्ज देण्यामध्ये बँका सकारात्मक आहेत.बचत गटाच्या अडचणीवर लक्ष असून त्याच्यावर मार्ग काढण्याचा निश्चितच प्रयत्न केले जातील.त्यामुळे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणे गरजेचे असल्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.तसेच बचत गटांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या वस्तुचे मार्केटिंग झाले पाहिजे, त्याचे लेबलींग, पॅकेजिंग उत्तम दर्जाचे असावे.बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम व्हाव्यात अशी अपेक्षा स्वामी यांनी व्यक्त केली.यावेळी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक लिंगराज शरणार्थी, विलास दुपारगुडे, उमेश डांगे, सविता खुळे, मोनाली कुरवडे, अंजली माने, नम्रता काटकर यांनी परिश्रम घेतले.