करमाळा (सोलापूर) : टाकळी येथील त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्यूनिअर कॉलेज येथे ‘महसूल सप्ताह’ अंतर्गत ‘युवा संवाद’ कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र कोकाटे होते. ‘युवा संवाद’ या कार्यक्रमांतर्गत जिंतीचे मंडळ अधिकारी संतोष गोसावी यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला.
मंडळ अधिकारी गोसावी यांनी विद्यार्थ्यांना महसूल विभाग, राज्यसरकार, ग्रामप्रशासन या विभागाशी संबंधी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या विवीध प्रश्नांची उत्तरे देत तलाठी भरती, राज्यसेवा परीक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोग, पोलिस भरती, आरक्षण याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 18 वर्ष पुर्ण झालेल्या व्यक्तीची मतदार नोंदणी करणेबाबत जनजागृती करून नाव नोंदणी लोकशाही बळकट करण्यासाठी करावी, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी टाकळीचे तलाठी रामेश्वर चंदेल, जिंतीचे तलाठी प्रबुद्ध माने, सुखदेव दोडमिसे, डॉ. गोरख गुळवे, महा ई सेवा केंद्रचालक समाधान तानवडे तसेच ज्यूनिअर काॅलेजचे शिक्षक उपस्थित होते.