करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा दोन दिवस थांबलेला प्रचार आज (शुक्रवार) दुःखाच्या सावटात उमेदवारांकडून सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचार थांबवला होता. कोर्नर बैठका, मेळावा, कार्यकर्त्यांच्या भेटी असे सर्व कार्यक्रम रद्द केले होते.
राज्यात १२ जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरु आहेत. मंगळवारी २७ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह देखील मिळाले. त्यानंतर उमेदवारांनी स्टिकर, पत्रक, प्रचाराच्या गाड्या आदींची तयारी केली. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी २८ तारखेला सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी उत्स्फुर्तपणे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. राज्यात सरकारकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
शुक्रवारी अनेक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. प्रचाराच्या गाड्या देखील फिरू लागल्या आहेत. मात्र अजूनही त्यावर दुःखाचे सावट दिसत असून आता मोठ्या सभा होणार नाहीत, असे समजत आहे. मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्र निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख बदलली असल्याने आणखी दोन दिवस प्रचाराला मिळणार आहेत. गुरुवारी ५ फेब्रुवारीला होणारे मतदान आता शनिवारी ७ तारखेला होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना वाढीव दोन दिवस प्रचाराला मिळाले आहेत. आज अनेक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. काही ठिकाणी प्रचाराच्या गाड्या देखील फिरताना दिसत आहेत.
