करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील चिखलठाण येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व राजेंद्र बारकुंड मित्र मंडळाच्या वतीने महाआरोग्य शिबिरामध्ये १ हजार ३४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उदघाटन पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव होते.
चिखलठाण येथे झालेल्या या शिबिरात चिखलठाणसह कुगाव, शेटफळ, केडगावमधील नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. उदघाटन झाल्यानंतर दिवसभर परिसरातील नागरिक तपासणीसाठी येत होते. आलेल्या रुग्णांना सेवा मिळावी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्यासह मित्र परिवाराचे कार्यकर्ते परिश्रम घेत होते.
या शिबिरासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता के. एम. उबाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, शिवसेना वैद्यकीय कार्यालय प्रमुख लक्ष्मण सुरवसे, चिखलठाण सोसायटीचे अध्यक्ष विकास गलांडे, आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष केरू गव्हाणे, माधवराव कामटे उपस्थित होते.
‘करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच छताखाली आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून येथे हे महाआरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांची या शिबिराला मदत झाली आहे,’ असे माजी उपाध्यक्ष बारकुंड यांनी सांगितले.
सर्पदंशासाठी मोफत उपचार देण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी केली आहे. त्याबद्दल चिखलठाण ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. या शिबिरात ४० डॉक्टरांनी व परिसरातील अशा सेविकांनी उस्थित राहून शिबीर यशस्वी केले.