करमाळा (सोलापूर) : अंधश्रद्धा निर्मूलन समिती व ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी करमाळा शहरात प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये विद्यार्थी, शिक्षक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
करमाळा शहरातून ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट येथून ही रॅली निघाली. फुलसौदर चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे ही फेरी काढण्यात आली. ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट येथे समारोप करण्यात आला. विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी विवेकाचा आवाज बुलंद करूया, फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर, हिंसेला नकार मानवतेचा स्वीकार अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. फेरीचा समारोप करताना अंनिसचे सोलापूर जिल्हा सचिव अनिल माने यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य व समाजामधील अंधश्रद्धा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. दाभोळकर यांची हत्या होऊन १२ वर्ष झाले. त्यांचे खुनी सापडले परंतु त्यांच्या सूत्रधाराचा अद्यापही तपास झालेला नाही. त्यामुळे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी अंनिसचे तालुका कार्याध्यक्ष दिगंबर साळुंके, प्राचार्य नागेश माने, संजय हंडे, बाळासाहेब दुधे, संतोष माने, अंनिसचे सचिव संतोष कांबळे, दादासाहेब पिसे, संगीता निंबाळकर, ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. महेश निकत, अश्विनी निकत, रईस आतार, महेश बोरुडे, बिरू ठोंबरे, महेश वीर, आशा शिंदे, कपिल बनसोडे, सुहास ढेंबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार राजेंद्र साने यांनी मानले.