करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने समाजबांधव मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना जेवण देण्यासाठी करमाळ्यातील मराठा व बहुजन समाजबांधव सरसावले आहेत. करमाळ्यातून आज (शनिवारी) साधणार १५०० समाजबांधवांसाठी जेवण नेले जाणार आहे. त्यासाठी शहर व तालुक्यातील बांधवानी श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ चपाती, चटणी- भाकरी, लाडू- चिवडा याशिवाय इतर जेवणाचे पदार्थ आज रात्री ९ वाजेपर्यंत आणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी मुंबईत आंदोलन सुरु केले आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी मोठ्याप्रमाणात समाजबांधव तेथे दाखल झाले आहेत. आरक्षण मिळेपर्यंत मैदान सोडणार नसल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे. समाजबांधव देखील मुंबईत मोठ्याप्रमाणात जमा झाले आहेत. तेही आरक्षण मिळेपर्यंत जाणार नाहीत. तेथे त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून करमाळ्यातून समाजबांधव आज जेवण घेऊन जाणार आहेत.
करमाळा शहर व तालुक्यातील मराठा व बहुजन बांधव आज रात्री ११ वाजता जेऊर रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने हे जेवण घेऊन मुंबईला जाणार आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन बळकट करण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हे सर्व साहित्य जमा केले जाणार आहे. वाहतूक कोंडीचा सामना होऊ नये म्हणून रेल्वेने जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक बांधवांनी जेवण देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.