करमाळा (सोलापूर) : गेल्या वर्षी राज्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे अनेक तालुक्यात दुष्काळ आहे. सोलापूर जिल्ह्याचे वैभव समजले जाणारे उजनी धरण देखील यावेळी शंभर टक्के भरले नाही. याच धरणावर असलेली दहिगाव उपसा सिंचन योजना ही करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी ठरली आहे. खरीप व रब्बी अशी दोन्ही आवर्तने तब्बल ११६ दिवस चालली आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांच्या नियोजनामुळे हे आवर्तन चालले असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे २४ गावातील केळी, ऊस पिकांसह तरकारीला मोठे जीवदान मिळाले आहे.

गेल्यावर्षी उजनी धरण ऑक्टोबरमध्ये अवघे ६०.६६ टक्के भरले होते. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे २ ऑक्टोबरपासून दहिगाव योजनेचे खरीप आवर्तन सुरू झाले. त्याला जोडूनच सलग रब्बी आवर्तनही १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले. हे आवर्तन धरण वजा पातळीत गेल्यानंतर म्हणजे २५ जानेवारीला बंद करण्यात आले. धरण भरल्यानंतर प्रथम सुरू होणारी व सर्वात शेवटी बंद होणारी दहिगाव उपसा सिंचन ही योजना आहे.

२०२१ पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ३.६९ रुपये प्रति युनिट व २०२२ नंतर ५.२६ रुपये प्रति युनिटप्रमाणे विद्युत देयेकाची आकारणी करण्यात येत होती. त्यामुळे ४ कोटी विद्युत देयक पाणीपट्टी वसूलीअभवी थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र आमदार शिंदे यांच्या विठ्ठल कार्पोरेशन कारखान्याने थकीत विज बिलाची हमी घेतल्याने विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला होता. दहिगाव योजनेसाठी अल्पदरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी आमदार शिंदे यांनी प्रयत्न केला.

कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२ चे उपाभियंता एस. के. अवताडे यांच्या म्हणण्यानुसार ८० लाखापेक्षा अधिक पाणीपट्टी वसूल करून महामंडळाकडे भरली आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे सुरुवातीच्या टप्प्यातील वीज बिल कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यातून भरले गेले. पुढील काळात शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी जमा करण्यासंदर्भात महामंडळाकडून सूचना करण्यात आल्या. त्यातूनच दहिगाव योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. २०२१- २२ मध्ये १२.८६ लक्ष, २०२२-२३ मध्ये ३५.६४ लक्ष व २०२३- २४ मध्ये आतापर्यंत ३५.१२ लक्ष इतकी पाणीपट्टी वसूल करून महामंडळाकडे भरणा करण्यात आली आहे.

दहिगाव उपसा सिंचन योजनेवरील उर्वरित काम बंद नलिकेतून होणार
दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी २०२३- २४ मध्ये ४० कोटी निधीची तरतूद करण्यात आली. त्यामधून प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे करण्याच्या कामाची १०१.३४ कोटीचे काम सुरु आहे.

याअंतर्गत प्रकल्पावरील २७ वितरिका व ९९ उपवितरिका, १९ थेट विमोचकाद्वारे प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र १०८०४ हे. करीता बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बंद नलिका प्रणालीद्वारे पाणी देण्याचे नियोजन केल्याने ०.४६ अघफू (टिएमसी) एवढी बचत होत असून त्यामधन ३५००-४००० हे. वाढीव क्षेत्रास पाणी देणे शक्य होणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *