करमाळा (सोलापूर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याकडून कामगारांची दिपावली गोड होणार आहे. गाळप हंगाम २०२२- २३ मध्ये कामावर हजर असणाऱ्या सर्व कामगारांना ८.३३ टक्के बोनस दिला जाणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

भांडवलकर यांनी म्हटले आहे की, ‘माजी आमदार शामलताई बागल, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार अत्यंत काटकसरीने व नियोजनबद्ध सुरू आहे. कारखान्याने नेहमीच सभासद व कामगारांच्या हिताचा विचार केला आहे. दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यासह कारखाना कार्यक्षेत्रात झालेल्या अत्यल्प पावसामुळे व आर्थिक अडचणीमुळे कारखाना गळीत हंगाम सुरू करू शकला नाही. मात्र आता कारखान्याची आर्थिक अडचण संपली असून पुढील काळात कारखान्याची गाळप क्षमता विस्तारीकरण करून जास्तीत जास्त गाळप करून इतर कारखान्याच्या स्पर्धेत ऊस दर देण्याचा मानस आहे.’