करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभेच्या निकालानंतर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांची आज (सोमवारी) पहिलीच पत्रकार परिषद होत आहे. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली मते उल्लेखनीय आहेत. त्यामुळे बागल या पत्रकार परिषदेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिग्विजय बागल हे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरले होते. यापूर्वी रश्मी बागल दोनवेळा निवडणुकीत उतरल्या पण त्यांचा पराभव झाला होता. सलग दोनवेळा पराभव झाल्यानंतरही बागल कुटुंबियांना मानणारा मतदार जागेवर राहिला आहे. बागल यांनी या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘धन्युष्यबाण’ चिन्ह घेतले होते. स्व. दिगंबरराव बागल यांचे ते चिरंजीव आहेत. मकाई व आदिनाथ या साखर कारखान्यामुळे बागल गट अडचणीत आला. मात्र ‘लाडक्या बहिणीं’मुळे बागल गटाला या निवडणुकीत मदत मिळाली असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीतील पराभवानंतर आज बागल यांची पहिलीच पत्रकार परिषद असून ते नेमके काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.