निभोरेंचे सरपंच वळेकर यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचा ‘ग्रामरत्न पुरस्कार’

करमाळा (सोलापूर) : अखिल भारतीय सरपंच परिषदेचा ‘ग्रामरत्न सरपंच सन्मान व गौरव’ पुरस्कार निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर यांना देण्यात आला आहे. पुणे (लोणावळा) येथे या पुरस्काराचे वितरण झाले.

सरपंच वळेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे ज्ञान असावे म्हणून 11 वर्षे शालेय स्पर्धा परीक्षा घेतल्या आहेत. बक्षीस म्हणून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शाल, सन्मानपत्र देत आहेत. त्यामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळू लागले आहेत. विद्यार्थ्यांसाठी शालेय खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे, दहावीत प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करून एक नवीन संकल्पना राबविली.

गावात आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीर, शेतकरी बांधवांसाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे व्याख्यान आयोजित करणे, महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबीर घेणे, तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे, धार्मिक कामात सढळ हाताने मदत करणे, गावच्या विकासासाठी तन, मन, धनाने प्रयत्न करणे या कामांमुळे सरपंच हे लोकप्रिय झाले आहेत.

श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा परतीचा मार्ग असलेला निंभोरे ते कोंढेज रस्ता त्यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला. गावासाठी आरोग्य उपकेंद्र मंजूर करून घेतले. तलाठी ऑफिस मंजुर केले. पानंद रस्ता करून घेतला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी घेतली, शाळेत कचराकुंडया बांधल्या. स्मशानभूमीसाठी वॉल कंपाउंड बांधले आणि पेविंगब्लॉक टाकले. गावठाणात रस्ते तयार केले व पेविंग ब्लॉक बसविले.आंबेडकर नगर येथे पाण्याची टाकी बांधून घरोघरी नळ दिले. गावातील मुख्य चौकात सिसिटीव्ही कॅमेरे बसविले. गावातील मुख्य चौकात आणि मंदिरासमोर हायमास्ट दिवे उभारले. संपूर्ण गावठाणात लाईटची सोय केली. ग्रामपंचायत निंभोरे येथे सर्व महापुरुषांची जयंती साजरी केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *