करमाळा (अशोक मुरूमकर) : साखर कारखाने सुरु झाले आहेत मात्र कमी जास्त प्रमाणात सतत पाऊस पडत असल्याने ऊसतोडीवर त्याचा परिणाम होत आहे. काही कारखाने १ तारखेला तर काही कारखान्याचा त्यापूर्वीच ऊस मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाला. तेव्हापासून ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. परंतु पावसामुळे पूर्ण क्षमेतेने ऊस तोड करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे.
करमाळा तालुक्यातुन अंबालिका, विठ्ठलराव शुगर, बारामती ऍग्रो युनिट १ व ३, कमलाई, ओंकार शुगर हिरडगाव व म्हैसगाव आदी साखर कारखान्यांना शेतकरी ऊस देत आहेत. ऊसतोडीसाठी मुकादमांची यंत्रणाही सज्ज आहे. अनेक ऊसतोड कामगार गावागावात टोळीच्या माध्यमातून दाखल झाले आहेत. यावर्षी पाऊस जास्त झाल्याने अनेकांच्या शेतात पाणी आहे. तर अनेक ठिकाणी चिखल असल्याने ऊस काढण्यासाठी रस्ते नाहीत. पाऊस उघडल्यानंतर रस्ता होऊ शकतो मात्र पुन्हा पाऊस आला की त्याचा परिणाम तोडणीवर होत आहे.
अनेक ऊसतोड मुकादमांनी रस्त्याच्याकडेला ऊस तोडण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र तेही ऊस संपल्यानंतर ऊस कसा तोडायचा असा प्रश्न निर्माण होत आहे. पावसामुळे ऊस वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. सतत कोठेना कोठे कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे चांगला पाऊस उगडल्याशिवाय साखर कारखान्यांची संपुर्ण यंत्रणा कार्यान्वित होणार नाही, असे चित्र आहे.
