करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला (अजित पावर गट) मोठी संधी आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचा विजय झाला नाही तर पुढे कार्यकर्ते टिकवणे आव्हान राहणार आहे. त्यामुळे माजी आमदार शिंदे यांनी तालुक्यात सर्वसमावेशक व जनाधार असलेल्या व्यक्तींवर जबाबदाऱ्या देण्याची गरज आहे.
करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा व पंचायत समितीच्या १२ जागा आहेत. योग्य रणनीती आणि सर्वसमावेशक, जनाधार असलेल्या व्यक्तींची सल्लागार समिती नेमून योग्य डाव टाकला तर बहुतांश जागांवर शिंदे गट (राष्ट्रवादी) विजयी मिळवू शकतो. मात्र बदल झाला नाही तर पुढे शिंदे गटाला कार्यकर्ते टिकवणे कठीण जाऊ शकते, अशी दबक्या आवाजात चर्चा आहेत.
करमाळा तालुक्यात पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण जास्त चालते. माजी आमदार शिंदे हे कायम उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेते मानत आले आहेत. ते तालुक्यात शिंदे गटाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या गटात अनेक जनाधार असलेले आणि सर्वसमावेशक चेहरे आहेत. तालुक्यातील राजकीय गटाला पर्याय म्हणून शिंदे गटाकडे पाहिले जाते. त्यातून हा गट वाढत गेला. मात्र त्यांचे विरोधक त्यांना तालुक्यातून हद्दपार करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी सर्व एकत्र येतात. त्यात शिंदे गटाचा कार्यकर्ता स्थानिक पातळीवर टार्गेट होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी माजी आमदार शिंदे हे आश्वासक मानले जात आहेत. मात्र राजकीय डावपेचात शिंदे गट पिछाडीवर पडत आहे. विकास कामे करताना आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे करताना माजी आमदार शिंदे यांनी कधीही राजकारण पाहिले नाही. मात्र त्याचे मतात रूपांतर होत आहे का? मतात रूपांतर करण्यासाठी योग्य समीकरणे आवश्यक असतात. मात्र तसं होत नसल्याची चर्चा आहे. गावातील निष्ठेने काम करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यालाही एखाद्याचे काम झालेले माहित होत नाही. यातून स्थानिक पातळीवर दोन गट निर्माण होत असून त्याचा परिणाम मतावर होत आहे. काम केलेच पाहिजे पण त्याचे मतात रूपांतरही करून घेतले पाहिजे. त्यासाठी योग्य काळजी घेतली पाहिजे.
शिंदे यांचा करमाळ्यात गट सक्रिय झाल्यापासून त्यांच्या मतात सतत वाढ झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना आणि त्यानंतर आमदार असताना त्यांनी मोठ्याप्रमाणात विकास कामांसाठी निधी आणला. मात्र त्यांच्याबाबत विरोधकांनी निर्माण केलेले ‘नेरिटिव्ह’ बदलण्यात कार्यकर्ते कमी पडत आहेत. पुढे आदिनाथ आणि नगरपालिका निवडणुकीतही तसेच चित्र दिसले. त्यांच्याकडे अनेक जनाधार असलेले आणि सर्वसमावेशक तालुक्यातील नेते आहेत. त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक जिंकण्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित केल्या पाहिजेत. माजी आमदार शिंदे यांना काहीजण चुकीची तर माहिती देत नाहीत ना? असे प्रश्न केले जाऊ लागले आहेत.
माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने स्वबळावर आगामी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मात्र अनेक कार्यकर्ते युती- आघाडी होण्याची वाट पाहत आहेत. फक्त शिंदे गटाला युती आघाडीची का गरज पडत आहे? मरगळ झटकून कार्यकर्ते कामाला लागल्यास आणि माजी आमदार शिंदे यांनीही कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन संपर्क ठेऊन विजयी मिळवायचाच अशा सूचना दिल्या पाहिजेत. येथे काही पदाधिकारी नेमून त्यांच्यावर जबाबदाऱ्याही दिल्या पाहिजेत. तरच येथे विजय शक्य आहे अन्यथा येणाऱ्या काळात कार्यकर्ते टिकणे अवघड होणार आहे.
