करमाळा (सोलापूर) : ‘जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले या संधीसाधू आहेत’ असा आरोप पाटील गटाचे सोशल मिडीया प्रमुख संजय फडतरे यांनी केला आहे.
फडतरे यांनी म्हटले आहे की, ‘जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी आपल्या मुलाला गावच्या एका प्रभागात निवडून आणुन दाखवावे. मग त्यांनी तालुका पातळीवरील नेत्यांना आवाहन द्यावे.’ करमाळा तालुका विकास आघाडीकडून उमेदवारी दिली गेली नसल्याने मोहिते पाटील गटाच्या राजेभोसले यांनी कोर्टी जिल्हा परिषद गटातील उमेदवार वनीता गुळवे यांचा प्रचार सुरू केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, ‘सवितादेवी राजेभोसले यांना उमेदवारी देण्यास आमदार नारायण पाटील हे कायमच सकारात्मक राहीले होते. त्यांची उमेदवारी सुध्दा जाहीर केली होती. परंतू त्यावेळी त्यांनी करमाळा तालुका विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल न करता राष्ट्रवादीकडुन (शरद पवार गट) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांनी प्रसिद्धी माध्यमातून सुध्दा ही माहिती मतदारांना दिली. त्यावेळी आपण मोहिते पाटील एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण अवघ्या एकदोन दिवसात त्यांनी आपली भुमिका बदलली.’
