करमाळा (सोलापूर) : ‘करमाळा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व परिसरात सुशोभीकरण करणे व चबुतरा बांधकामासाठी ५० लाख निधी द्यावा’, अशी मागणी शिवस्मारक प्रतिष्ठाण व भाजप नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान तत्काळ निधी देण्याचे आश्वासन गोरे यांनी या शिष्ठमंडळाला दिले आहे. याशिवाय करमाळा शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांना निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
करमाळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अतुल फंड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, अरुण जगताप, माजी नगरसेवक प्रविण जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड, विनय ननवरे, गणेश महाडिक, काका सरडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘करमाळा नगरपालिका हद्दीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरण करणे व चबुतरा बांधकामास ५० लाख निधी मंजूर करून द्यावा’. यावर पालकमंत्री गोरे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना केली आहे. याशिवाय शहरातील भाजप नगरसेवकांना त्वरित विकास निधी दिला जाईल, असेही आश्वासन गोरे यांनी दिले आहे.
