करमाळा : शिवसेना- भाजप युती झाली तेव्हापासून करमाळा मतदारसंघ शिवसेनेचाच असून या मतदारसंघातून तीन वेळा शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेला आहे. गतवर्षी शिवसेनेत बंडखोरी झाली शिवसेनेतून इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांची मते एकत्रित केली तर शिवसेनेचा उमेदवार ५० हजार मतांनी विजयी झाला असता करमाळा शिवसेनेची स्वतंत्र ताकद असून शिवसेना हा मतदार संघ सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर करमाळ्याची जागा राष्ट्रवादीला जाणार अशा प्रकारची अफवा व चर्चा काही लोकांनी जाणीवपूर्वक करण्यास सुरुवात केली आहे. चिवटे म्हणाले, काही कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार अशा वावड्या उठवण्यास सुरुवात केली आहे. शेवटी पक्षप्रमुख मुख्यमंत्री शिंदे सांगतील तोच उमेदवार या मतदारसंघातून धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्व अधिकार मुख्यमंत्री शिंदे, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांना आहे. उमेदवार कोणीही असला तरी धनुष्यबाणाच्या चिन्हावरचा उमेदवार करमाळा मतदारसंघातून विधानसभेला निवडून जाणार हे निश्चित आहे, असेही ते म्हणाले आहेत.
मंत्री सावंत यांच्या प्रयत्नामुळे करमाळ्याची अर्थवाहिनी असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी करमाळा तालुक्याला उपलब्ध झालेला आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेत अनेकजण प्रवेश करणार आहेत, असेही ते म्हणाले आहेत.