करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील नेरले तलाव दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने भरून घेण्यात यावा, अशी मागणी माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे. या तलावाच्या पाण्यावर वरकुटे, आळसुंदे, सालसे, नेरलेतील चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. याबरोबर घोटी येथून येणाऱ्या ओढ्यावर नेरले येथे तलाव आहे. नेरले व वरकुटे गावात काही छोटे बंधारे आहेत. घोटी व साडे येथील ओढ्यातून पाणी सोडल्यास हे सर्व बंधारे व दोन्ही तलावात पाणी येऊ शकते. त्यामुळे वरकुटे ,आळसुंदे, सालसे, नेरले, आवाटी व लोणी (ता. माढा) या सहा गावातील पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.
या गावांमध्ये तलावाच्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी करोडो रुपये खर्च करून ऊस, केळीची लागवड केली आहे. पाऊस अत्यल्प असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत या पिकांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. ‘पाण्याची मागणी केली की, तुमचे तलाव दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट नाहीत’, असे सांगितले जाते. परंतु वरकुटे, आळसुंदे, सालसे ही गावे दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट आहेत. आणि या तलावाच्या पाण्याचा वापर या तिन्ही गावाला होतो.
उजनी प्रकल्पात करमाळा तालुक्यातील अनेक गावे बुडीत झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांना उजनीचे पाणी देणे बंधनकारक आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी येथून पाणी सोडले होते. त्याचप्रमाणे घोटी व साडे ओढ्यातून दोन्ही तलावासाठी पाणी सोडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे केली आहे, असे ते म्हणाले आहेत. पाणी न सोडल्यास याचे गंभीर परिणाम येत्या काळात लोकप्रतिनिधींना भोगावे लागतील, असेही माजी सरपंच म्हणाले आहेत.